माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची भाषणे प्रेरणादायी असत. यापैकी एक, कलाम यांच्या ‘इंडिया २०२०’ या पुस्तकाचा पाया ठरणारे हे भाषण.. स्वातंत्र, विकास आणि ‘जगासह-जगासाठी भारत’ अशी त्रिसूत्री देणारे.. कलाम यांचा आनंद कशात होता, हेही विस्ताराने सांगणारे..

आपला इतिहास ३००० वर्षांचा आहे. अनेक ठिकाणांहून लोक येथे आले, त्यांनी आपल्यावर राज्यही केले आणि केवळ आपली भूमी कब्जात घेण्यावर न थांबता, आपल्या मनांवरही त्यांनी ताबा मिळवला. आक्रमणांचा हा इतिहास अलेक्झांडरपासूनचा आहे. ग्रीक आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आणि फ्रेंच तसेच डचही येथे आले. या सर्वानी आपल्याला लुटले. जे आपले होते ते त्यांचे झाले. तरीही आपण मात्र कोणत्याही देशावर आक्रमण कधीच केलेले नाही. आपण जमिनीवर कब्जा केलेला नाही, आपण सांस्कृतिक अतिक्रमणे केली नाहीत, आपण कुणाची राष्ट्रे ध्वस्त केली नाहीत. असे का? मला वाटते, आपण इतरांच्याही स्वातंत्र्याचा आदर करणारे आहोत, म्हणून.
म्हणूनच, माझे पहिले स्वप्न आहे स्वातंत्र्याचे.
भारताला स्वातंत्र्याचे पहिले विराट दर्शन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातून झाले, असा माझा विश्वास आहे. हेच ते स्वातंत्र्य, जे आपण जोपासले पाहिजे, वाढवून बुलंद केले पाहिजे. आपण स्वतंत्र नसलो, तर कोणीही आपला मान राखणार नाही.
माझे दुसरे स्वप्न आहे, विकास.
जवळपास ५० वर्षे आपण ‘विकसनशील देश’ म्हणून राहिलो. आता वेळ आली आहे स्वतकडे विकसित देश म्हणून पाहण्याची. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केल्यास आपला क्रमांक जगातील पहिल्या पाच देशांमध्ये लागतो. अनेक क्षेत्रांत आपल्या देशाचा वाढदर दहा टक्के आहे. आपल्याकडली गरिबीची पातळी कमी-कमी होते आहे आणि आपल्या यशाची दखल आता जगाकडूनही घेतली जाते आहे. तरीदेखील आपण स्वतला विकसित – स्वावलंबी आणि स्वतवर विश्वास असलेला देश मानण्यास कचरत असू, तर आपला आत्मविश्वास कमी पडतो आहे, हेच त्यामागचे कारण. खरे ना?
माझे तिसरे स्वप्न आहे.. भारताने जगासोबत आणि जगासाठी उभे राहावे, हे. आपण जगासाठी आणि जगासोबत उभे राहिलो नाही, तर आपल्याला मान मिळणार नाही, असेही मला वाटते. स्वतमध्ये शक्ती असेल, तरच शक्तींची साथ मिळते. आपली ही शक्ती म्हणजे केवळ लष्करी बळ नव्हे. आर्थिक सामथ्र्यसुद्धा आपण वाढवले पाहिजे.. हे दोन्ही बाहू सशक्त असले पाहिजेत.
माझे भाग्य असे की, मला तीन महान मनाच्या माणसांसह काम करायला मिळाले. अंतराळ विभागाचे डॉ. विक्रम साराभाई आणि त्यांच्यानंतर प्रोफेसर सतीश धवन, आणि तिसरे डॉ. ब्रह्म प्रकाश- म्हणजे भारताच्या अणुइंधनाचे शिल्पकार. मी या तिघांना अगदी जवळून पाहू शकलो, ही आयुष्यात मला मिळालेली सर्वात मोठी संधी होती, त्या अर्थाने हा केवळ माझ्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल, म्हणून मी भाग्यवान.
माझ्या आयुष्यात चार महत्त्वाचे टप्पे आले :
पहिला : ‘इस्रो’ मधली- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतली माझी २० वर्षे. ‘एसएलव्ही-३’ या भारतीय बनावटीच्या पहिल्याच उपग्रह-वाहक यानाच्या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून- म्हणजे प्रकल्प संचालक म्हणून करण्याची संधी मला मिळाली. याच यानाने ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा सोडला. ही दोन दशके माझ्या वैज्ञानिक आयुष्यात महत्त्वाची होती.
दुसरा : ‘इस्रो’नंतर मी ‘डीआरडीओ’मध्ये (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत) गेलो आणि तेथेही, क्षेपणास्त्र वाहकांवर काम करण्याची संधी मला मिळाली. ‘अग्नी’चे परीक्षण १९९४ मध्ये सफल झाले, तेव्हा मला जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता.
तिसरा: अणुऊर्जा विभाग आणि डीआरडीओ यांनी अणुचाचणीसाठी अत्यंत मोलाची भागीदारी केली, तेव्हाचा टप्पा. ११ आणि १३ मे १९९८ या दिवशी मी स्वर्गसुख तिसऱ्यांदा अनुभवले. माझ्या पथकासह माझा सहभाग या चाचणीमध्ये असल्यामुळे,  भारत काय करू शकतो हे जगापुढे सिद्ध करून दाखवण्याची संधी मला मिळाली होती. आम्ही यापुढे ‘विकसनशील’ देश नसून विकसित देशांपैकी आहोत, हे भारताने सप्रमाण दाखवून दिले होते. भारतीय असल्याचा अभिमान ओसंडत होता माझ्यातून. ‘अग्नी’ क्षेपणास्त्र नुसते पुन्हा वापरता येण्याजोगे करून आम्ही थांबलो नव्हतो. त्यासाठी नवे साहित्यही आम्ही वापरले होते. हे साहित्य म्हणजे कर्ब- कार्बन, वजनाला अत्यंत हलके.
चौथा : टप्पा जरा निराळा आहे. एके दिवशी हैदराबादच्या निझाम इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून अस्थिरोगतज्ज्ञ असलेले एक डॉक्टर माझ्याकडे आले. त्यांनीही, आम्ही ‘अग्नी’ साठी वापरलेले कार्बनआधारित साहित्य उचलून पाहिले, तेव्हा त्याच्या हलकेपणाने ते अचंबित झाले. तेवढय़ावर न थांबता, मला रुग्णालयात नेऊन त्यांनी काही रुग्णांशी माझी गाठ मुद्दाम घालून दिली. कितीतरी लहानलहान मुले होती तिथे. त्यांच्या पायांत धातूंच्या कॅलिपर होत्या. वजनाला या कॅलिपर तीनतीन किलो, म्हणजे मुलांसाठी जडच. पाय ओढावे लागत होते या मुलांना. डॉक्टर मला म्हणाले : या मुलांच्या वेदना हलक्या होण्यासाठी काही तरी करा. तीन आठवडय़ांत आम्ही अवघ्या ३०० ग्रॅम वजनाची नवी साधने बनवली आणि रुग्णालयात घेऊन गेलो. मुलांचा तर स्वतच्या डोळय़ांवर विश्वासच बसेना. हरखून पाहातच राहिली ती. आता तीन किलो वजन वागवावे न लागता, त्यांना चालता येणार होते. या मुलांच्या डोळय़ांमध्ये अश्रू तरळले, तेव्हा मला चौथ्यांदा स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता.
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे गेलो असता मी तेथील एक इंग्रजी वृत्तपत्र वाचत होतो. आदल्याच दिवशी जोरदार बॉम्बहल्ले आणि जीवितहानी झाली होती. परंतु या इस्रायली वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मोठे छायाचित्र होते, ते वाळवंटात अवघ्या पाच वर्षांत ‘धान्याचे कोठार’ पिकवून दाखवणाऱ्या एका ज्यू शेतकऱ्याचे. हे चित्र प्रेरणादायी खरेच. हे चित्र पाहून आदल्या दिवशीच्या संहाराचा, बॉम्बहल्ल्याचा आणि बळींचा विसर पडावा, अशी स्फूर्तिदायी शक्ती या चित्रात नक्कीच होती. अर्थात, या बातम्याही त्या दैनिकात होत्याच. आपल्याकडे मात्र याच बातम्यांना प्राधान्य असते.. मृत्यू, आजार, दहशतवाद, गुन्हे..  असे का? आपण इतके नकारात्मक का आहोत?
आणखी एक प्रश्न :
एक राष्ट्र म्हणून आपल्याला, परदेशी बनावटीच्या वस्तूंचे इतके आकर्षण कसे काय? आपल्याला चित्रवाणी संच ‘फॉरेनचे’ हवे असतात, शर्टसुद्धा ‘इम्पोर्टेड’ हवा असतो.. परकीय तंत्रज्ञान आपल्याला हवेसे वाटते. जे जे आयात केलेले ते ते चांगले, हे कोठले आकर्षण? आत्मसन्मानाची भावना विकसित होऊन सार्थकी लागण्यासाठी आधी स्वावलंबित्व हवे, हे आपल्याला लक्षातच कसे येत नाही? हैदराबादेतील या भाषणाला येत असताना एका १४ वर्षांच्या मुलीने माझी स्वाक्षरी मागितली. मी तिला विचारले : तुझे ध्येय काय? स्वप्न काय? ती म्हणाली- मला माझा देश विकसित झालेला पाहायचा आहे. तिच्यासाठी आपल्याला- तुम्हाला आणि मला- विकसित भारताची उभारणी करायची आहे.
चला उद्घोष करू.. भारत हा काही विकसनशील देश नाही. आपले राष्ट्र विकसित राष्ट्र आहे.. भले ते आज घसरणीच्याच विकसित टप्प्यावर का असेना!

Writer Vishwas Patil Post for Vishal Patil
‘बोफोर्सच्या वादळात राजीव गांधींचं पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू निराधार’, विश्वास पाटील यांची पोस्ट चर्चेत
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”
sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची

राष्ट्रपती असताना फाशीची शिक्षा हे आपल्यापुढील अत्यंत कठीण काम होते. न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर निर्णय घेणे कठीण होते, कारण बहुसंख्य प्रकरणे सामाजिक आणि आíथक विषमतेशी निगडित होती.  व्यक्तीचे वैमनस्य नसते आणि गुन्हा करण्याचा त्याचा हेतू नसतो, अशा व्यक्तीला आपण शिक्षा देत आहोत, अशी त्या वेळी माझी धारणा होत होती. तथापि, एका प्रकरणात उदवाहन चालकाने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. त्या प्रकरणात मात्र मी त्याची फाशीची शिक्षा कायम केली.

मी शिक्षक आहे व अमेरिकेत प्राध्यापक म्हणून शिकवले आहे, त्यामुळे जिथे ज्ञान आहे तिथे मी जातोच. मुख्यत्वेकरून तरुण पिढीला भेटण्यास मला आवडते. त्यांच्या ज्ञानात सहभागी होणेही मला आवडते,
– बीजिंग,  २ नोव्हेंबर २०१२

देश २०२० च्या दिशेने झेपावत आहे. देशातील ५४ कोटी तरुण या बदलात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. यात तुम्हीही सहभागी होऊ शकता. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान पाच वृक्ष लावावे.    

एकविसाव्या शतकातील जग हे ज्ञानावर आधारित समाजासह विविध संधी उपलब्ध करून देणारे असेल आणि या ज्ञानाकरिता विद्यापीठ हे ऊर्जा पुरविणारे घर म्हणून कार्य करेल.