भारत आणि पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन ही रोजचीच बाब झाली असून, बुधवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने अशी आगळीक केली.
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ात नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानच्या सैनिकांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जोरदार गोळीबार व बॉम्बफेक केली. याबाबत लष्कराचे प्रवक्ता कर्नल आर. के. पाल्टा यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सैनिकांनी स्वयंचलित बंदुकांच्या सहाय्याने रात्री साडेनऊपासून तुफान गोळीबार सुरू केला, याशिवाय त्यांच्याकडून मध्यम आकाराचे बॉम्बही फेकण्यात येत होते. पाकिस्तानी सैन्याकडून अशा गोष्टी सध्या रोजच घडत असल्याने सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.  
 उभय बाजूंची ही चकमक तब्बल एक तास सुरू होती, त्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार थांबविण्यात आला. या गोळीबारात आपल्या जवानांपैकी कोणीही जखमी झाले नाही. याच सुमारास मेंधर क्षेत्रातही पाकिस्तानच्या सैन्याने अर्धा तास जोरदार गोळीबार केला, या हल्ल्यासही आपल्या जवानांनी चोख उत्तर दिले, असे पाल्टा यांनी सांगितले.
शस्त्रसंधी निर्थक
उभय देशांत २००३मध्ये झालेली शस्त्रसंधी पाकिस्तानच्या कारवायांमुळे निर्थक ठरत आहे. २२५ कि.मी. लांबीच्या पूंछ-राजौरी क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून जवळपास दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.
 चालू वर्षांत पाकिस्तानने आतापर्यंत ८० वेळा अशी आगळीक केली असून, केवळ ऑगस्टमध्येच २८ वेळा असे प्रकार घडले आहेत, अशी माहिती पाल्टा यांनी दिली.
महत्त्वाची विधेयके लटकली
या गोंधळामुळे बहुचर्चित अन्न सुरक्षा विधेयकावर चर्चाच होऊ शकली नाही. लोकसभा कामकाजाच्या कार्यक्रमपत्रिकेवर अन्न सुरक्षा विधेयकाव्यतिरिक्त भू-संपादन विधेयकाचाही विषय होता, मात्र लोकसभा दिवसभरासाठी तहकूब झाल्याने ही दोन्ही महत्त्वाची विधेयके गुरुवारी लटकली.