नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये रविवारी सलग पाचव्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांनी वाढ करण्यात आली. यामुळे या दोन्ही इंधनांचे दर देशभरात आजवरच्या विक्रमी पातळीवर पोहचले आहेत.

एक लिटर पेट्रोल भरण्यासाठी आता मुंबईत ११३.४६ रुपये द्यावे लागणार असून, दिल्लीत हेच दर १०७.५९ रुपये झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर लिटरमागे १०४.३८ रुपयांवर, तर दिल्लीत ९६.३२ रुपयांवर पोहचले आहेत. देशातील सर्व मोठय़ा शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली असून,  अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिझेलनेही ही पातळी ओलांडली आहे. डिझेलचे दर १०० रुपयांहून अधिक होणारे पश्चिम बंगाल हे रविवारी अलीकडचे राज्य ठरले.  इंधनदरांत तीन आठवडे काही बदल न होण्याची प्रक्रिया संपल्यानंतर २८ सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर २१ वेळा वाढवण्यात आले आहेत. तेव्हापासून पेट्रोलचे दर लिटरला ६.४० रुपयांनी वाढले आहेत. डिझेलच्या दरांत २४ सप्टेंबरपासून २४ वेळा मिळून लिटरला ७.७० रुपयांनी वाढ झाली आहे.