रक्तात चीड निर्माण करणारी एक घटना उत्तरप्रदेशातल्या लखनऊतून समोर आली आहे. ३५ वर्षांच्या एका सामूहिक बलात्कार पीडित महिलेवर आरोपींनी चौथ्यांदा अॅसिड हल्ला केला आहे. गुरूवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान ही निषेधार्ह घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ही  ३५ वर्षीय पीडित महिला वसतिगृहाबाहेर असलेल्या हँडपंपावर पाणी आणण्यासाठी गेली होती तेव्हा तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशात गुन्हेगारी तर वाढलेली आहेच, मात्र या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची  लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत.

पीडिता ज्या वसतिगृहात राहते, तिथेच बंदुकधारी पोलीस उभे होते, ते बंदोबस्तावर असतानाही हल्ला झाला आहे त्यामुळे नराधम किती बेलगाम आणि मोकाट झाले आहेत याचेच उदाहरण समोर आले आहे. ही पीडित महिला अॅसिड हल्ला झालेल्या महिलांद्वारे चालवण्यात येणाऱ्या एका कॅफेमध्ये काम करते. तसेच तिच्यावर तिच्या दोन मुलांचीही जबाबदारी आहे. रायबरेली या गावातली ही महिला असून तिच्यावर २००८ मध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच त्याहीवेळी तिच्यावर अॅसिड हल्लाही करण्यात आला होता.

गेल्या ९ वर्षांपासून ही महिला न्याय मिळावा म्हणून लढते आहे. मात्र या महिलेवर खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला जातो आहे. तसेच तिला धमकावलेही जाते आहे. मात्र या महिलेने आपला संघर्ष सुरूच ठेवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. मात्र याप्रकरणी कोणताही निकाल अद्याप लागलेला नाही. तसेच या नराधमांची हिंमत इतकी बळावली आहे की त्यांनी पु्न्हा एकदा या पीडितेवर अॅसिड हल्ला केला आहे. या आधीही या महिलेवर या खटल्यातल्या आरोपींनी अॅसिड हल्ला चढवला आहे.

२३ मार्च २०१७ रोजी या पीडित महिलेला बळजबरीने अॅसिडही पाजले आहे. ही महिला तेव्हा आपल्या मुलांसोबत ट्रेनने प्रवास करत होती. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या महिलेची भेट घेतली तसेच तिच्यावर हल्ला करणाऱ्या आणि बलात्कार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करू असे आश्वासनही दिले. मात्र आता समोर आलेल्या या घटनेमुळे सगळे पालथ्या घड्यावर पाणी आहे असेच म्हणायची वेळ या महिलेवर आली आहे.

मागील हल्ल्यानंतर या महिलेला जेव्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा एका महिला कॉन्स्टेबलने तिच्यासोबत सेल्फी काढला होता, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. एका बलात्कार पीडित महिलेच्या बाबतीत पोलीस किती असंवेदनशील झाले आहेत हेच या घटनेमुळे समोर आले होते. आता या महिलेवर पुन्हा एकदा अॅसिड हल्ला झाला आहे. आपल्याला न्याय मिळणार की नाही? हाच एकमेव प्रश्न आता या महिलेच्या मनात असेल यात शंका नाही