दिल्लीतील सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या २३ वर्षीय तरुणीच्या संघर्षांची दखल घेत तिला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अशोकचक्र देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या दिल्ली विभागाने बुधवारी केली. याबाबतचे एक पत्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी दिली.
पीडित तरुणीने दाखवलेले धैर्य आणि केलेला संघर्ष संपूर्ण देशाला प्रोत्साहित करणारा असून या घटनेने साऱ्या देशवासीयांना हेलावून टाकले आहे, असे गुप्ता यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. १९८६ मध्ये पॅन एम एअरलाइन्समध्ये काम करणाऱ्या नीरजा भानोत हिने प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी मुकाबला करीत प्राण सोडला होता. त्याची दखल घेत तिला सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, याची आठवण करून देत पीडित तरुणीलाही तिने दाखवलेल्या धैर्याबद्दल अशोकचक्राने सन्मानित करावे, असे गुप्ता पत्रात म्हटले आहे.