गोवा सरकारने आपल्या मंत्र्यांसाठी ‘बहुराष्ट्रीय’ अभ्यास दौरा आयोजित केला असून त्यास प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. गोव्यातील खाण उद्योग सध्या थंडावला असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात अडकली आहे. खाण उद्योगाकडून राज्याला मोठा महसूल मिळत होता. तोच उद्योग आता अडचणीत आल्यामुळे या महसुलास कात्री लागली आहे. या पाश्र्वभूमीवरच राज्यातील मंत्र्यांचा हा दौरा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेचा विषय ठरला आहे.‘ग्रामीण पर्यटन’ या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली इस्रायल आणि अन्य देशांच्या दौऱ्यावर शिष्टमंडळ जात असून आपणही त्यांच्यासमवेत जात असल्याची माहिती गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. इस्रायलमध्ये ‘ग्रामीण पर्यटना’ची संकल्पना चांगली रुजली असून गोव्यातही याचे प्रतिबिंब उमटावे, म्हणून अभ्यास करण्यासाठी आम्ही तेथे जात आहोत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हेही आमच्यासमवेत येण्याची शक्यता असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. आर्थिक आघाडीवर कडक उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच शासकीय अधिकाऱ्यांना दिले होते. असे असतानाही हा ‘अभ्यास दौरा’ करण्याचा घाट घातला जात आहे.