गोव्यात काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये सहभागी झालेले माजी आमदार विश्वजीत राणे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेससाठी ही आत्मचिंतनाची वेळ आहे. काँग्रेसला आता सचिन पायलट यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्याला पुढे आणण्याची गरज आहे. राहुल गांधींना नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करता आलेली नाही, अशी टीका करत काँग्रेस आपले संख्याबळ गमावत असून स्थानिक नेत्यांपासून पक्ष दूर चालला असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी हीच काँग्रेसच्या मार्गातील सर्वात मोठी समस्या आहे. त्यांच्यासाठी मी माझी राजकीय कारकीर्द उद्धवस्त करू शकत नाही, असा टोलाही राणे यांनी लगावला. पर्रिकर सरकारने विश्वजीत राणे यांना मंगळवारी आरोग्य मंत्रीपद दिले आहे. पदभार घेतेवेळी राणे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
विश्वजीत राणे यांचे वडील प्रतापसिंह राणे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते म्हणाले, राहुल गांधी हीच काँग्रेसच्या मार्गातील अडचण आहे. इतकंच नव्हे तर ते ज्या लोकांना कामासाठी निवडतात, तीही मोठी समस्या असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधींबरोबर सहजपणे काम करता येत नाही, आणि तेही त्यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्याच्या एकदम विरूद्ध भाजपमध्ये असल्याचे ते म्हणाले. भाजपमधील नेतृत्वाकडून तुमच्यावर विश्वास दाखवला जातो, काम करण्यासाठी पाठिंबा दिला जातो. इथे तुमची जबाबदारी निश्चित आहे. त्यामुळे निर्णय घेणेही सोपे जाते.
दिग्विजय सिंह यांना काँग्रेसच्या आमदारांचा नेता बनवण्यासच इतका वेळ लागला की, तोपर्यंत भाजपने सरकारही स्थापन केले. जेव्हा भाजप नेतृत्वाबरोबर चर्चा सुरू होती. तेव्हा राहुल गांधींबरोबर संपर्कही होत नव्हता. मी राहुल यांच्या बेजबाबदारपणामुळे हैराण आहे. त्यांच्यासाठी मी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावू शकत नाही. माझ्या निर्णयामुळे माझे वडील नाराज आहेत. परंतु, काही कालावधीनंतर त्यांना माझा निर्णय योग्य असल्याचे लक्षात येईल, असेही ते म्हणाले.
विश्वजीत राणे हे नुकताच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता स्थापन करता आली नव्हती. दिग्विजयसिंह यांना याबाबत जबाबदार ठरवत राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.