नवी दिल्ली : गुजरातमध्ये विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत मिळू लागल्यानंतर, दिल्लीतही राजकीय वातावरण तापू लागले आहे. जामिनावर सुटलेले अपक्ष आमदार व दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी थेट दिल्लीत येऊन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घणाघाती शाब्दिक हल्ला चढवला.

काँग्रेसला पाठिंबा देणारे  मेवानी यांनी सोमवारी काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत, ‘‘मोदी हे दलित विरोधी असून पंतप्रधान कार्यालयात बसलेल्या गोडसेभक्तांनी माझ्या अटकेचे कारस्थान रचले होते,’’ असा गंभीर आरोप केला. ‘‘मी पंतप्रधानांविरोधात ट्वीट केले म्हणून देशाच्या दुसऱ्या टोकाला असलेले आसाम पोलीस एका रात्रीत मला अटक करायला आले. माझ्यासारखा एखादा दलित नेता विरोधात बोलला तर मोदी इतके असुरक्षित का होतात? मोदी जातीयवादी असून त्यांना दलित समाजातील नेत्यांची विधाने सहन होत नाहीत,’’ असाही आरोप  मेवानी  यांनी केला.  मेवानींची पत्रकार परिषद आयोजित करून काँग्रेसने अप्रत्यक्षपणे गुजरातमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजवले आहे. 

‘‘मुस्लिमांचा नरसंहार करण्याची भाषा धर्मसंसदेत केली जाते. मुंद्रा बंदरात १.७५ लाख कोटींचे अमली पदार्थ जप्त होतात. वडगाममध्ये मुस्लिमांवर-दलितांवर अत्याचार होतात. दलित महिलेने गुजरातमधील मंत्र्याविरोधात बलात्काराचे आरोप केला. २२ वेळा प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना झाल्या. तरीही, कथित साधूंची, मुंद्राचे मालक गौतम अदानींची वा वडगाममधील हल्लेखोरांची वा मंत्र्याची चौकशी होत नाही. प्रश्नपत्रिका फुटल्याविरोधात अजूनही गुन्हा दाखल नाही. पण एक ट्वीट केले म्हणून मला अटक होते’’, असे सांगत  मेवानी  यांनी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत होण्याची भीती असल्याचा दावा केला. मुंद्रा प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करावी अन्यथा १ जून रोजी गुजरातमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला.

२५०० किमीच्या प्रवासाची पोलिसांची तत्परता!

गेल्या आठवडय़ात मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आले असताना मेवाणी यांनी ट्वीट करून पंतप्रधानांनी गुजरातमध्ये धार्मिक सलोखा व शांतता राखण्याचे आवाहन करावे असे म्हटले होते. हिंमतनगर, खंबाट आणि वेरावल या तीन शहरांमध्ये हिंसक घटना झाल्या होत्या. त्याचा संदर्भ देताना  मेवानी यांनी ‘‘मोदी हे गोडसेंना दैवत मानतात,’’ असा उल्लेख ट्वीटमध्ये केला होता. या ट्वीटविरोधात आसाममध्ये  मेवानी  यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. ‘‘मला रात्री साडेअकरा वाजता आसाम पोलिसांनी अटक केली. हे पोलीस २५०० किमी अंतरावरून आले होते. कोकराझारहून गुवाहाटी, तिथून बंगळुरु, मग अहमदाबाद, तिथून १४० किमीवर असलेला माझा मतदारसंघ वडगाम इतका प्रवास या पोलिसांनी तातडीने कसा केला? गुन्हा झाल्या-झाल्या ते आसाममधून कसे निघाले? मी आमदार असूनही विधानसभाध्यक्षांना का कळवले नाही? हा घटनाक्रम पाहिला तर गुन्हा दाखल करण्यामागे भाजपचे सुनियोजित करस्थान होते, असा दावा  मेवानी  यांनी केला.

न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे

मेवाणी यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तवणूक केल्याचाही गुन्हा दाखल केला गेला, पण स्थानिक न्यायालयाने आसाम पोलिसांवर ताशेरे ओढले. पोलिसांनी मेवाणींविरोधात बनावट गुन्हा दाखल केला असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पोलिसांनी आपले वर्तन सुधारावे, अशी सूचना न्यायालयाने केली व ही घटना आसाम उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणली जाईल, असेही स्पष्ट केले.