अवघ्या १९ दिवसांमध्ये तब्बल पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घालणारी भारताची स्प्रिंटर हिमा दास हीने आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर आता आपले मोठे लक्ष्य असल्याचे सांगत जागतिक विजेतेपदावर नाव कोरायचे असल्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने आपल्या भावना सांगितल्या.

हिमाने म्हटले की, विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केलेली कामगिरी ही माझ्यासाठी वॉर्मअप खेळ होता. त्यानंतर आता मी मोठे लक्ष्य निश्चित केले आहे, स्प्रिंटरमध्ये जागतिक विजतेपद मिळवण्याचे आपले ध्येय असेल असे तिने म्हटले आहे. तसेच चाहत्यांचे आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम राहिल्यास त्यांना निराश करणार नाही उलट आपली कामगिरी सतत उंचावत ठेवेन असा विश्वासही तिने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना दिला आहे.

‘सर्वांनी माझे कौतुक केल्याबद्दल मला खूपच चांगले वाटले. प्रेसिडन्ट सर, प्राइम मिनिस्टर सर, सचिन सर आणि अमिताभ बच्चन सर आणि इतर सर्वच लोकांनी माझे अभिनंदन केले त्याबद्दल या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. माझ्यावर सर्वांचा असाच आशिर्वाद कायम राहू द्या. नुकत्याच झालेल्या पाच स्पर्धा या माझ्यासाठी वॉर्मअप स्पर्धा होत्या. कारण, पुढे येणाऱ्या मोठ्या स्पर्धांसाठी त्या मला उपयोगी पडणार आहेत. जसे की जागतिक विजेतेपद स्पर्धा येत आहे त्यासाठी माझी तयारी सुरु आहे. त्यामुळे माझ्यावर तुमचा असाच आशिर्वाद कायम ठेवा त्यामुळे या स्पर्धेतही मी तुमच्या अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, जय हिंद!’, अशा शब्दांत हिमा दासने एका व्हिडिओतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.