कमला दास या मल्याळम साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांच्यावर आज गुगलने डुडल केले आहे. कमला दास यांनी स्त्रियांच्या लैंगिक आयुष्यावर आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर विपुल लेखन केले आहे. स्त्रियांच्या भेडसावणाऱ्या समस्या, त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या समस्या याबाबत त्यांनी लिहिले आहे. कमला दास यांचा जन्म हिंदू परिवारात झाला. मात्र वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यापासून त्यांना सुरैय्या या नावानेही ओळखले जाऊ लागले.

केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. मातृभूमी या प्रसिद्ध वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक व्ही. एम. नायर आणि नालापत बलमानी अम्मा यांच्या घरी कमला यांचा जन्म झाला. कमला यांची आई बलमानी अम्माही मल्याळी कवयित्री होत्या. कमला दास यांचे बालपण कोलकातामध्ये गेले. त्यांना कवितेचे बाळकडू त्यांच्या आईकडूनच मिळाले. त्यांच्या आईपप्रमाणेच त्याही कविता लिहू लागल्या. कमला दास यांचे काका नालापत नारायण मेननही लेखक होते. नालापत मेनन यांच्या लेखनाचाही कमला दास यांच्यावर प्रभाव होता. कवितांबाबत त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झाले ज्यातूनच त्या कवितेकडे वळल्या.

वयाच्या १५ व्या वर्षी बँकर माधव दास यांच्याशी कमला यांचा विवाह झाला. माधव दास यांनीही त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले. काही काळानंतर कमला दास यांच्या रचना इंग्रजी आणि मल्याळम भाषेत छापल्या जाऊ लागल्या. १९७६ मध्ये कमला दास यांचे माय-स्टोरी नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी स्त्रियांना भेडसावणाऱ्या लैंगिक समस्याचे चित्रण केले होते. वेगळ्या धाटणीचे पुस्तक लिहिल्याने त्या चर्चेत आल्या. त्यानंतर स्त्रीवादी साहित्य लिहिणाऱ्या लेखिकांमध्ये त्यांनी लौकिक मिळवला.

 

लेखिका आणि कवयित्री कमला दास यांचे संग्रहित छायाचित्र

स्त्रियांना त्यांच्या सामाजिक आणि व्यक्तीगत आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांवर त्यांनी बेधडकपणे लिखाण केले. या समस्यांवर त्यांनी आपले विचार मांडले. तसेच स्त्रियांच्या लैंगिक समस्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांवरही भाष्य केले. कवितेच्याबाबतीत त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना ‘मदर ऑफ मॉडर्न इंडियन इंग्लिश पोएट्री’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. अनेक पीडित महिला आणि अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या महिला आजही कमला दास यांना आदर्श मानतात. गुगलने याच कमला दास यांच्यावर डुडल तयार केले आहे.