कुठल्याही विषयाच्या माहितीने वापरकर्त्यांला ज्ञानपूर्ण करीत अभ्यासू ‘इंटलॅक्चुअल’ पिढी हद्दपार करून ‘गुगलॅक्चुअल’ पिढी बनविणारे ‘गुगल’ हे सर्च इंजिन आता अधिक उपयुक्त आणि अधिक खासगी बनण्याच्या वाटेवर आहे. आपल्या ओळखीच्या होमपेजमध्ये बदल करून वापरकर्त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार माहितीने भरलेले होमपेज गुगल दाखल करणार आहे. यात तापमानापासून, रहदारी किंवा हव्या असलेल्या माहितीची नोंद आयती वापरकर्त्यांला गुगलवर गेल्यावर तातडीने मिळणार आहे.
नवे काय?
सध्याचे गुगलचे होमपेज पांढऱ्या स्क्रीनवर सर्च बॉक्स आणि रोजच्या प्रासंगिक डुडलने युक्त असते. ‘गुगल नाऊ’ या नव्या होमपेजवर सध्या कंपनीचे काम सुरू असून, त्यांच्या अँड्रॉईड फोनवर, वेबसाइटवर व सर्चपेजवर ते उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गुगलच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. आपल्याला हवी तेवढी माहिती, हवी तेव्हा मिळवून ती होमपेजवर तातडीने अद्ययावत ठेवण्याची सुविधा या नव्या वेबपेजमध्ये असणार आहे. ‘गुगल नाऊ’ घरगुती संगणकावर (डेकस्टॉप) कसा दिसेल, याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
विशेष काय?
गुगलचे सध्याचे स्वरूपही त्याच्या प्रत्येक वापरकर्त्यांला माहितीसाठी उपकारक ठरत आहे. या नव्या होमपेजमुळे माहितीचे केंद्रीकरण होऊन अनावश्यक गरजेच्या माहितीपासून गुगल वापरकर्त्यांला लांब ठेवेल. आपल्याला हवी ती आणि हवी तितकीच उपयुक्त माहिती याद्वारे देण्याचा गुगलचा निर्धार आहे.
कसे करणार काम?
गुगल नाऊ व्यक्तीची वैयक्तिक माहिती उदा. घराचे ठिकाण, कामाचे स्वरूप यांची नोंद करून त्याला अनुरूप माहिती होमपेजवर उपलब्ध करून देईल. घराच्या परिसरात असलेले तापमान, परिसरात असलेली रहदारीची स्थिती, या माहितीचे संपादन करून आणखी काय हवे, त्याची मागणी वापरकर्त्यांला करता येईल. समजा, घराजवळील रस्त्यांवर चक्काजाम असेल, तर त्याचा अंदाज गुगल नाऊ थेट वापरकर्त्यांला आधीच देईल, शिवाय पर्यायी मार्गही सुचवेल. वापरकर्त्यांला एखादा खेळ आवडत असेल, तर त्या खेळातील आंतरराष्ट्रीय सामन्यांची ताजी माहिती होमपेजवर थेट सादर झालेली असेल.