२०१७ मध्ये वैमानिकांची पहिली तुकडी सक्रिय

हवाई दलात महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून कामगिरी देण्यास संरक्षण मंत्रालयाने शनिवारी मान्यता दिली. हवाई दलात महिलांना लढाऊ वैमानिकाची जबाबदारी देण्यात यावी या प्रस्तावावर बरीच चर्चा झाली होती. या प्रस्तावाला मान्यता देण्यास काही वेळ द्यावा लागेल, असे संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले होते, पण हा प्रस्ताव आता मंजूर करण्यात आला आहे. हवाई दल अकादमीत वैमानिक प्रशिक्षण घेतलेल्या महिलांमधून पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांची निवड केली जाणार आहे. या निर्णयामुळे नौदलातही महिला वैमानिकांना लवकरच लढाऊ वैमानिक  म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

संरक्षण मंत्रालयाने प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जून २०१६ मध्ये लढाऊ वैमानिक महिलांच्या पहिल्या तुकडीची निवड करण्यात येईल. या तुकडीला एक वर्षांचे प्रगत प्रशिक्षण देण्यात येईल व जून २०१७ मध्ये तुकडीतील महिला वैमानिक लढाऊ विमानाच्या कॉकपीटमध्ये बसतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या हवाई दलाच्या महिला वैमानिक विमाने व हेलिकॉप्टर चालवतात, पण त्यांना आता लढाऊ विमाने चालवण्याची संधी उपलब्ध होत आहे. महिलांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचा हेतू त्यामागे आहे. याबाबतचे सूतोवाच हवाई दलाच्या ८३व्या वर्धापनदिनानिमित्त हिंडोन हवाई दल विमानतळावर एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी या महिन्यातच केले होते.
महिलांना हवाई दलात पर्मनंट कमिशन देण्यात यावे, असा निकाल २०१० मध्ये उच्च न्यायालयाने दिला होता. पण, त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. लष्करी दलांमध्ये महिलांना लढाऊ विमाने चालवण्याची भूमिका देण्याचे मान्य करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे.
संयुक्त अरब अमिरातीच्या हवाईदलात महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश असून त्यांनी इसिसविरोधातील कारवाईत भाग घेतला होता.

भारतीय हवाई दल
’ महिलांची संख्या- १५००
’ महिला वैमानिक- ९४
’ महिला नेव्हीगेटर्स-१४