देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दुय्यम दर्जाच्या उत्पादनांच्या (विशेषत: चीनमधून होणाऱ्या) आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने उद्योगसमूहांना स्वस्त आयात मालाचा उत्पादननिहाय तपशील सादर करण्यास सांगितले आहे. त्यांची देशांतर्गत उत्पादनांच्या किमतीशी आणि जर करांबाबत गैरफायदा घेण्यात येत असल्यास त्याच्याशी तुलना करण्यासाठी सरकारने सविस्तर तपशील सादर करण्यास सांगितले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

चीनमधून होणाऱ्या आयातीवर अवलंबून राहणे कमी व्हावे यासह ‘आत्मनिर्भर भारत’ला चालना देण्याबाबतच्या उपायांवर पंतप्रधानांच्या कार्यालयात अलीकडेच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती, असेही सूत्रांनी सांगितले.

चीनमधून आयात होणारा कच्चा माल आणि माल या बाबत उद्योगसमूहांना त्यांचे मत आणि सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. मनगटी आणि भिंतीवरील घडय़ाळे, काचेच्या टय़ूब, केसांना लावण्याचे क्रीम, शाम्पू, चेहऱ्याला लावण्याची पावडर, डोळे आणि ओठ यांना लावण्यात येणारी प्रसाधने, छपाईची शाई आदींसह काही तंबाखूजन्य पदार्थ यांचा त्यामध्ये समावेश आहे, असेही सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे २०१४-१५ आणि २०१८-१९ या कालावधीत आयातीमध्ये झालेली वाढ, त्याच उत्पादनांचे देशांतर्गत दर, देशांतर्गत क्षमता, मुक्त व्यापार धोरणानुसार करण्यात आलेली आयात या बाबतचा तपशीलही सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

सरकारने केलेल्या सूचनेनुसार या सर्व उत्पादनांवरील आमचे मत काय आहे त्याचा तपशील तयार केला जात असून लवकरच तो उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयास सादर करण्यात येणार आहे, असे उद्योगसमूहांमधील सूत्रांनी सांगितले.