सर्व नागरिकांना लाभ आणि न्याय मिळण्याची खातरजमा करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि तोच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास यांचा आधार आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी ठरणाऱ्या उपकरणांचे वाटप मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी मोदी यांनी संस्कृत श्लोकाचा आधार घेत वरील मत व्यक्त केले. देशातील १३० कोटी जनतेची सेवा करणे याला आपल्या सरकारचे प्राधान्य आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

शारीरिक व्यंग असलेल्या लोकांचा यापूर्वीच्या सरकारने विचारच केला नाही, मात्र आपल्या सरकारने या लोकांच्या समस्यांचा विचार करून त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी मार्ग शोधले आहेत, असे ते म्हणाले. गेल्या सरकारच्या राजवटीमध्ये दिव्यांगांसाठी अशा प्रकारची शिबिरे कमी प्रमाणात आयोजित करण्यात आली, मात्र गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने देशाच्या विविध भागांमध्ये अशी जवळपास नऊ हजार शिबिरे आयोजित केली, असे ते म्हणाले.

शारीरिक व्यंग असलेल्या प्रत्येक युवकाचा आणि मुलाचा सहभाग नवभारताच्या निर्मितीमध्ये आवश्यक आहे, उद्योगक्षेत्र असो, सेवाक्षेत्र असो किंवा क्रीडाक्षेत्र असो, दिव्यांगांमधील कौशल्यास सतत प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मोदी म्हणाले. ज्या संवेदनक्षमतेने दिव्यांगासाठी सरकारने काम केले आहे तसे काम यापूर्वी झाले नाही, दिव्यांगांना बेसहारा सोडून देणे आम्हाला मान्य नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.