कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सतर्क झालेल्या शासनाकडून अन्नधान्याच्या संभाव्य वाढीवर आगाऊ तोडगा काढण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आह़े  कांद्याच्या देशांतर्गत पुरवठय़ात वाढ करण्यासाठी आणि दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून हे पाऊल उचलण्यात येण्याची शक्यता आह़े
कांद्याच्या वाढत्या दरावर आम्ही पूर्ण नजर ठेवून आहोत़  हे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही अनेक पर्यायांचा विचार करीत आहोत़  त्यापैकी निर्यातबंदी हाही एक असल्याचे शासकीय सूत्रांनी
सांगितल़े
‘राजकीयदृष्टय़ा संवेदनशील वस्तू’ असलेल्या कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांतील किमतीत गेल्या काही आठवडय़ांत प्रचंड वाढ झाली आह़े  महाराष्ट्रासारख्या कांदा उत्पादक राज्यांमधून अतिवृष्टी झाल्याने कांद्याची बाजारातील आवक घटल्याचा हा परिणाम असल्याचे निष्पन्न होत आह़े
दिल्लीतील किरकोळ बाजारात कांद्याची प्रतिकिलो किंमत ३० ते ४० रुपयांपर्यंत पोहोचली आह़े  तर महाराष्ट्रातील लासलगाव येथील घाऊक बाजारात कांद्याची किंमत २५ रुपये प्रतिकिलो झाली आह़े
अधिकृत आकडेवारीनुसार, या वर्षी पहिल्या आर्थिक तिमाहीत भारताने ५ लाख ११ हजार ६१६ टन कांद्याची निर्यात केली आह़े  याची किंमत ७७६.४७ कोटी आह़े  मागील वर्षी याच काळात ५ लाख १७ हजार २७४ टन कांद्याची निर्यात करण्यात आली होती़
पुढील महिन्यापर्यंत कांद्याच्या किमती चढय़ाच राहण्याची शक्यता आह़े  कारण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान येथील कांद्याचे नवे पीक ऑक्टोबरपासून बाजारात येण्याची अपेक्षा आहे, असे नाशिक येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितल़े