१२ व्या पंचवार्षिक योजनेत ८ टक्क्यांहून अधिक आर्थिक वृद्धिदराचे उद्दिष्ट गाठता यावे यासाठी भारतात गुंतवणुकीला पोषक वातावरण तयार करण्यासाठी सरकार पावले उचलीत असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी येथे जाहीर केले.
गुंतवणुकीत वाढ व्हावी आणि देशात आणि परदेशात गुंतवणूकदारांना भारत अधिकाधिक आकर्षक वाटावा यासाठी आम्ही पावले उचलण्यात पुढाकार घेतला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मोठय़ा पायाभूत प्रकल्पांसाठी आम्ही शीघ्रगतीने पावले उचलली आहेत, असेही ते म्हणाले.
एशियन डेव्हलपमेण्ट बँकेच्या ४६ व्या वार्षिक सभेत पंतप्रधान बोलत होते. या वेळी विविध देशांचे अर्थमंत्री आणि गव्हर्नर उपस्थित होते. उच्च आर्थिक वृद्धिदर गाठण्यासाठी भारताने पावले उचलल्याचे ते या वेळी म्हणाले.
विशाल प्रकल्पांमध्ये गुंतवणूक होण्यासाठी सरकारने मंत्रिमंडळाची समिती नियुक्त केली असून तिला एक हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांना मान्यतेचे अधिकार दिले आहेत.