उत्तराखंडमधील निसर्गप्रकोपात अडकलेल्यांची सुटका करताना आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या २० वीरांना शुक्रवारी सैनिकी मानवंदना देण्यात आली़  मंगळवारी बचावकार्यादरम्यान झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात या २० जणांचा मृत्यू झाला होता़. या हुतात्म्यांना श्रद्धांजली देत असतानाच दुसरीकडे बचावकार्यात मात्र खंड पडलेला नाही़  या जलप्रपातात बेपत्ता झालेल्या ३ हजार लोकांना शोधण्याचे कार्य आता सुरू करण्यात आले आह़े
या भीषण जलप्रपातात हजारो लोक अडकून पडले होत़े  त्यांच्या सुटकेचे कार्य गेल्या आठवडय़ाभरात हाती घेण्यात आले होत़े  आता हे बहुतांश कार्य पूर्ण झाल्याने बेपत्ता झालेल्यांचा आणि मृतदेहांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेण्यात आले आह़े  बहुतांश मृतदेह नदीच्या राडारोडय़ाखाली दबले असण्याची शक्यता आह़े  त्यामुळे शक्य तिथे हा गाळ स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़
हेलिकॉप्टर अपघातातील मृतांमध्ये ५ भारतीय हवाई दलाचे, ९ राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे  (एनडीआरएफ) आणि ६ भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे जवान होत़े  त्यांना शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा आणि भूदलाचे प्रमुख जनरल बिक्रम सिंग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डेहराडून येथे मानवंदना देण्यात आली़
ही मानवंदना म्हणजे देशासाठी सर्वात मोठे बलिदान देणाऱ्या २० शूरांच्या हौतात्म्याची आठवण ठेवण्याचा लहानसा प्रयत्न आह़े  यात जीव गमावलेल्या सर्वासाठी आम्ही प्रार्थना करतो, असे या वेळी केंद्रीय गृहमंत्री म्हणाल़े  अनेक लोक अजूनही बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्याकडे आता सर्व लक्ष केंद्रित करता येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितल़े  बद्रीनाथ परिसरात मोठय़ा प्रमाणात अडकलेल्या वृद्ध, आजारी, अपंग आणि महिला यात्रेकरूंची सुटका करण्यालाही प्राधान्य देण्यात येईल, असेही ते म्हणाल़े  तसेच भारतीय वायुदलाची हेलिकॉप्टर आणखी १५ दिवस या भागातील बचावकार्यात भाग घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली़  बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर, अद्याप सुटका न झालेल्यांच्या साहाय्यासाठी आणखी हेलिकॉप्टर पाठविण्याचे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिल़े
दरम्यान, केंद्र शासनाने चारधाम यात्रेच्या मार्गाचे पुनर्वसन करण्यासाठी शुक्रवारी १९५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आह़े  पूरपरिस्थितीमुळे या मार्गाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आह़े  केंद्रीय पर्यटनमंत्री के. चिरंजीवी यांनी दिलेल्या माहितीनुसार या निधीचा व्यय, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या पवित्र स्थळांचा जीर्णोद्धार आणि आजूबाजूचा परिसर तसेच या ठिकाणांपर्यंत जाणारे रस्ते यांच्या पुनर्विकासासाठी करण्यात येणार आह़े  तसेच या निधीचा वापर उत्तराखंड शासन त्याच्या गरजेनुसार करणार असल्याचेही चिरंजीवी यांनी
सांगितल़े
पूरग्रस्त उत्तराखंडच्या सर्व भागांतून सर्व माणसांची सुखरूप सुटका होईपर्यंत लष्कर याचे बचावकार्य सुरू ठेवील, असे आश्वासन या वेळी भूदलप्रमुख सिंग यांनी दिल़े  सिंग यांनी दिवसभर पूरग्रस्त भागाचा दौरा केला आणि आपल्या अधिकाऱ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बचावकार्य सुरू ठेवण्याचे आदेश दिल़े  अद्यापही काही ठिकाणी काही जण जिवंत असल्याची माहिती मिळत आह़े  गुरुवारी उत्तर बद्रीनाथमध्ये ४० जण जिवंत असल्याची माहिती मिळाली होती़  त्यानुसार शोध घेण्यात आला़  मात्र आम्ही त्यांना शोधू शकलो नाही़  हवामान ठीक राहिले तर त्यांना शोधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येईल, असेही सिंग यांनी गौचर येथे पत्रकारांना सांगितल़े
रोगराई पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचेही कार्य वेगाने उरकण्यात येत आह़े  मृतदेहांची ओळख पटविणे आणि डीएनए नमुने गोळा करणे या औपचारिकता झाल्यानंतर केदारनाथ खोऱ्यातील सुमारे ३४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार आले आहेत़
हवामान सुधारत असल्यामुळे या भागात अद्यापही अडकलेल्या १ हजार २३७ जणांना सोडविण्यासाठी १७ हेलिकॉप्टर्सनी उड्डाण केले आह़े  हर्षिल सेक्टरमधील सर्व यात्रेकरूंची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्राकडून देण्यात आली़  आता बद्रीनाथ धरण भागातील सर्वाधिक असलेल्या  यात्रेकरूंच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत़  जोशी मठ-बद्रीनाथ, रुद्रप्रयाग-गौरीकुंड आणि उत्तरकाशी-गंगोत्री हे मार्ग वगळता इतर सर्व मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत़  त्यामुळे बचावकार्याला वेग येणार आहे, असेही सूत्रांनी सांगितल़े  आतापर्यंत १ लाख ४ हजार ६८७ जणांची विविध ठिकाणांहून वायू आणि जमीन मार्गे सुटका करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितल़े

नागरिकांना पायपीट करण्यास भाग पाडू नका – सर्वोच्च न्यायालय
उत्तराखंडतील महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या नागरिकांना दूर अंतर पायपीट करण्यास भाग पाडू नका, त्यांना विमानाने सुरक्षित स्थळी न्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तराखंड सरकारला दिला. त्यानंतर, बचावकार्य शनिवापर्यंत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने न्यायालयास दिले.

उत्तराखंडमध्ये स्थानिकांची अन्नान्नदशा
पूराचा भयाण तडाखा बसलेल्या उत्तराखंडमधील खेडय़ापाडय़ांत स्थानिकांची अन्नान दशा झाली आह़े  उध्वस्त घर- संसार नव्याने उभा करण्याची धडपड ते करीत आहेत़  वाहून गेलेली शेती आणि कोसळलेली घरे इतकेच फुटके भांडवल आता त्यांच्या हाताशी आह़े  पाहुण्या आलेल्या गंगामाईने सारेच फस्त केल्याने आता खायचे तरी काय असा हतबल प्रश्न त्यांच्या पुढे आह़े
आमच्याकडे तीन- चार दिवस पुरले इतकेच अन्नधान्य शिल्लक आह़े  गुप्तकाशीपर्यंत जाण्यासाठी आमच्या गावाला एकच पूल होता़  मात्र तो पूरात वाहून गेल्याने गाव एकाकी झाले आहे, अशी व्यथा चौमासीचे ग्राम प्रधान सुरेंद्र सिंग यांनी मांडली़  या गावाची लोकसंख्या सुमारे ६०० आह़े  सिंग काही ग्रामस्थांसह बिकट वाटेने अन्नधान्य पुरविण्याची मागणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात आले होते, त्या वेळी माध्यमांना त्यांनी ही माहिती दिली़