बँकात पैसे नसल्याने संताप अनावर झालेल्या नागरिकांनी गुजरातमधील दोन बँकांवर हल्ला करून तोडफोड केली व टाळे ठोकले. ही घटना सोमवारी (दि. १९) घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सौराष्ट्रातील अमरेली जिल्ह्यातील समधालिया गावात पैसे न मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि देना बँकेच्या ग्राहकांना बँकांना टाळे ठोकले. रविवारी बँका बंद असल्यामुळे सोमवारी पैसे काढण्यासाठी बँकेसमोर मोठी रांग लागली होती. परंतु बँकेने या सर्वांना रोख रक्कम नसल्याचे पैसे देण्यास समर्थ नसल्याचे म्हटले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी बँकेच्या खिडक्या, दरवाजांची तोडफोड केली. सलग तीन दिवस लोकांना बँकेतून पैसे मिळाले नव्हते. रांगेत उभारलेल्यांपैकी बहुतांश शेतकरी असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. अशीच घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर येथे मंगळवारी घडली. पगाराचे पैसे मिळत नसल्याने बँक ग्राहकांनी बँकेला टाळे ठोकले.
गुजरातमधील बँकेच्या अधिकाऱ्याने यावर खुलासा देताना पैसेच नसल्याने बँक उघडण्यात अर्थ नव्हता असे म्हटले. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा येथील एका बँकेतील कर्मचाऱ्यांनाही संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गेल्या तीन दिवसांपासून येथील बँकेत पैसे उपलब्ध नव्हते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संतप्त ग्राहकांच्या तावडतीतून बँकेचे कर्मचारी वाचू शकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १ हजार रूपयांच्या नोटाबंदीची घोषणा केली होती. ही घोषणा करताना त्यांनी देशातील काळा पैसा संपुष्टात आणण्यासाठी व दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. पंरतु तेव्हापासून देशातील नागरिकांना अभूतपूर्व चलनटंचाईला सामोरे जावे लागत आहे.