गुजरातमध्ये गोध्राकांडापश्चात उसळलेल्या दंगली हे शासनव्यवस्थाच्या अपयशाचे आणि कुचकामी प्रशासनाचेच उदाहरण असल्याची स्पष्टोक्ती गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘एनडीटीव्ही’वरील ‘वॉक द टॉक’ कार्यक्रमात ‘इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांनी घेतलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पर्रिकर यांनी वरील उत्तर दिले. त्याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचा गाढा प्रशासकीय अनुभव लक्षात घेता त्यांची झालेली निवड सुयोग्य असल्याचेही स्पष्ट केले.
निवडणुकीच्या काळात भ्रष्टाचार आणि महागाई हे विषय कायम चर्चेत येतात. राजकीय नेत्यांची प्रशासनावरील पकड ढिली झाल्यामुळेच भ्रष्टाचार आणि महागाई वाढते, असे सर्वसामान्यांना समज असतो. त्यामुळे राजकीय नेतृत्त्व कणखर हवे, असे त्यांचे मत असते. या स्थितीत मोदी यांचे नेतृत्त्व उजवे आहे, असा दावा पर्रिकर यांनी केला.
गुजरातमधील गेल्या दहा वर्षांतील राज्य कारभार हाकण्याची पद्धत वादातीत असल्याचे सांगून पर्रिकर यांनी गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगली हा त्यावरील एक डाग होता, हे देखील मान्य केले. गुजरातमधील दंगलींप्रकरणी एकाच व्यक्तीकडे सगळ्यांनी बोटे दाखवणे कदापि योग्य नाही. त्यावेळी शासनव्यवस्था अपयशी ठरली. समाजातील सर्वजण दोन टोकांमध्ये विभागले गेले. मोदी यांनी त्यावेळी नव्यानेच प्रशासनाचा कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे आता त्यांची प्रशासनावर जितकी पकड आहे, तितकी त्यावेळी नक्कीच नव्हती. त्यामुळे एकट्या मोदी यांना दोष कसा काय देता येईल, असा प्रश्न पर्रिकर यांनी उपस्थित केला.