गुजरातच्या पर्यटन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींविषयी सध्या प्राणीप्रेमींकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या जाहिरातींमुळे पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश जात असून त्यामुळे कच्छच्या वाळवंटातील जंगली गाढवांना धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत या जाहिरातींवर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी पर्यटन विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत नीलगाय, लांडगे, वाळवंटी कोल्हे, फ्लेमिंगो आणि जंगली गाढवांचा उल्लेख करण्यात आला आहे. कच्छच्या या वाळवंटात या आणि या प्राण्यांशी शर्यत लावा, असेही या जाहिरातीत म्हटले होते. मात्र, ‘शर्यत लावा’ या शब्दाच्या उल्लेखामुळे आपापल्या गाड्या घेऊन प्राण्यांच्या मागे लागा, असा चुकीचा समज पर्यटकांमध्ये निर्माण होऊ शकतो. कायद्यानुसार असे करणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. कच्छच्या वाळवंटात घुड़खर ही आशियाई गाढवांची दुर्मिळ प्रजाती आढळते. पर्यटन विभागाच्या जाहिरातीवरून चुकीचा समज झालेल्या पर्यटक गाडी घेऊन  या गाढवांच्या मागे लागले तर त्यांना गंभीर इजा होऊ शकते, असे राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाच्या माजी सदस्य दिव्या भानू सिंग चावडा यांनी सांगितले.

वन्यजीव कायदा १९७२ नुसार प्राण्यांना त्रास दिल्यास पाच हजार ते दहा हजार रुपयांचा दंड आणि दोन ते सहा महिन्यांच्या कारवासाची शिक्षा होऊ शकते. गुजरातमध्ये केवळ ४,४५१ जंगली गाढवे उरली आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्राणीसंवर्धन समितीने (आययूसीएन) धोक्यात असलेल्या प्रजातींमध्ये या गाढवांचा समावेश केला होता.

मात्र, गुजरात पर्यटन विभागाने हे सर्व आक्षेप फेटाळून लावत या जाहिरातीमागे आमचा कोणताही चुकीचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, या आक्षेपांनंतर आम्ही जाहिरातीमध्ये योग्य ते बदल करू, असे आश्वासनही पर्यटन विभागाकडून देण्यात आले. आम्ही ‘शर्यत लावा’ हा शब्द केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी वापरला होता. मात्र, आता त्यामध्ये आवश्यक ते बदल केले जातील, असे पर्यटन विभागाचे आयुक्त एन. श्रीवास्तव यांनी सांगितले.