प्रार्थनेचे सूर आणि २१ तोफांच्या सलामीत दिवंगत माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांच्या पार्थिवावर शनिवारी यमुनेच्या तीरावर स्मृतीस्थल येथे राष्ट्रीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज राष्ट्रीय नेते यावेळी उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू यांची स्मृती जपणारे ‘शांतीवन’ आणि लालबहाद्दूर शास्त्री यांची स्मृती जपणाऱ्या ‘विजयघाटा’च्या मधोमध गुजराल यांच्या पार्थिवास त्यांच्या दोन्ही पुत्रांनी अग्नी दिला.
त्याआधी पुष्पाच्छादित लष्करी वाहनातून तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव पाच जनपथ या त्यांच्या निवासस्थानाहून स्मृतीस्थल येथे आणले गेले.
संरक्षणमंत्री ए. के. अँटनी तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सुशीलकुमार शिंदे, वाणिज्यमंत्री आनंद शर्मा, कायदामंत्री अश्वनी कुमार, फारुख अब्दुल्ला, जयपाल रेड्डी, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा, लोकदलाचे अध्यक्ष ओमप्रकाश चौताला, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान, अमर सिंह तसेच अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.