भारतात निर्मिती करण्यात आलेल्या डॉर्नियर २२८ या ‘मेड इन इंडिया’ विमानाचा आता युरोपमध्ये वापर सुरु होऊ शकतो. नागरी उड्डाण महासंचालनालयने (डीजीसीए) २०१७ च्या अखेरीस हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) द्वारा निर्मित डॉर्नियर २२८ विमानास टीसी प्रमाणपत्र दिले होते. टीसी प्रमाणपत्रामुळे देशांतर्गत ऑपरेटर्सचा डॉर्नियर २२८ या बहुउपयोगी हलक्या विमानाचा नागरी उड्डाणासाठी वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

आता युरोपियन युनियनच्या हवाई सुरक्षा संस्थेने डीजीसीएने दिलेल्या प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. आता डॉर्नियरचा युरोपमध्ये व्यावसायिक उड्डाणासाठी वापर करता येऊ शकतो. आमच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट आहे असे डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार म्हणाले.

डॉर्नियर २२८ या १९ आसनी विमानाचा आधी फक्त संरक्षण दलापुरता वापर मर्यादीत होता. पण डिसेंबर २०१७ च्या अखेरीस डीजीसीएने डॉर्नियर २२८ च्या व्यापारी उपयोगास मंजुरी दिली. डॉर्नियर २२८ च्या व्यावसायिक वापरामुळे मोदी सरकारच्या महत्वकांक्षी उडान योजनेला बळकटी मिळेल अशी शक्यता होता. भारतात अजून या विमानाला व्यावसायिक यश मिळालेले नाही. कानपूरमधील एचएएलच्या वाहतूक विभागात डॉर्नियर २२८ विमानाची निर्मिती केली जाते. हे एक हलके बहुउपयोगी विमान आहे. प्रवासी वाहतुकीबरोबर समुद्री सुरक्षा, टेहळणीसाठी या विमानाची निर्मिती करण्यात आली होती. हे विमान रात्रीसुद्धा उड्डाण करण्यासाठी सक्षम आहे