हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हवाई हल्ला तर केलाच. मात्र, त्याचबरोबर समुद्रमार्गे आणि जमिनीवरूनही इस्रायलमध्ये घुसखोरी करत मोठं हत्याकांड केलं. यात अनेक सामान्य नागरिकांचीही हत्या केली. यात लहान मुलं, महिला आणि वयोवृद्धांचाही समावेश होता. याप्रकरणी आता इस्रायलच्या सुरक्षा दलाने हमासच्या काही दहशतवाद्यांना अटक केली. त्या दहशतवाद्यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी कशाप्रकारे इस्रायलच्या नागरिकांचं हत्याकांड केलं हे सांगितलं. तसेच या हत्याकांडासाठी हमासकडून त्यांना काय आश्वासन मिळालं होतं हेही कबुल केलं. इस्रायलने या दहशतवाद्यांच्या कबुलीचा एक व्हिडीओ जारी केला आहे.

हमासने इस्रायलच्या नागरिकांचं अपहरण करून गाझात आणण्यासाठी पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतं, अशी कबुली अटक करण्यात आलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी दिल्याची माहिती इस्रायल सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली. इस्रायलने जारी केलेल्या व्हिडीओत दहशतवादी म्हणाले, “जो कुणी इस्रायलच्या नागरिकांचं अपहरण करेल आणि गाझात घेऊन येईल त्यांना १० हजार अमेरिकन डॉलर आणि एक घर बक्षीस देण्याचं आमिष देण्यात आलं होतं.”

हमासकडून वयोवृद्ध महिला आणि लहान मुलांच्या अपहरणाच्या सूचना

हमासने अधिकाधिक लोकांचं अपहरण करण्यास सांगितलं. विशेष करून वयोवृद्ध महिला आणि लहान मुलांचं अपहरण करण्यास सांगितल्याचं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी इराणचा संबंध? अमेरिकेचे सैन्य अधिकारी म्हणाले, “पैसे पुरवणे…”

“कमांडर ओरडून मी मृतदेहावर गोळी वाया घालवत असल्याचं म्हटलं”

पीडित महिलेच्या हत्येविषयी सांगताना एक दहशतवादी म्हणाला, “तिचा कुत्रा भुंकत बाहेर आला आणि मी त्याच्यावर गोळी झाडली. घरात ती फरशीवर पडलेली होती, मी तिलाही गोळी मारली. त्यावेळी कमांडर माझ्यावर ओरडला आणि मी मृतदेहावर गोळी वाया घालवत आहे, असं म्हटला.”