उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. एकीकडे संताप व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमधील शाब्दिक वादही शिगेला पोहोचला आहे. विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीका होत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो ट्विट करत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी भाजपाला उपाहासात्मक टोला लगावला आहे.

हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. मात्र, त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरसच्या सीमेवरच रोखलं. त्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या भेटी आधी बराच संघर्ष बघायला मिळाला. आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी उत्तर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. पोलिसांच्या विरोधानंतरही काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीडितेच्या आईचं प्रियंका गांधी यांनी सांत्वन केलं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शशी थरूर यांनीही तो ट्विट केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे थरूर यांनी या फोटोसोबत ‘अनाडी’ सिनेमातील गाण्याच्या ओळी पोस्ट करत भाजपावर निशाणा साधला आहे.
“किसी का दर्द मिल सके तो ले उधार,
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार,
जीना इसी का नाम है।”
और हाँ ये कर दिखाने का हौंसला, दिल, जज्बात और “मौका” ऊपर वाला सब को नही देता। आप में अगर ये जज्बात हैं तो कीजिए, आपको किसने रोका है, मौका ही मौका है।,” असं थरूर यांनी म्हटलं आहे.

हाथरसमध्ये जाऊन राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं होतं. त्याचबरोबर न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली होती. “अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहिल, जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही. काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे,” असं राहुल गांधी म्हणाले होते.