फ्रान्समध्ये व्यंगचित्र साप्ताहिकावर हल्ला केल्यानंतर एका मार्केटमध्ये चार जणांना ओलिस ठेवणारा अ‍ॅमेडी कॉलिबली हा तेथील पोलिस कारवाईत ठार झाला असला, तरी त्याची प्रेयसी बॉमेडिएन ही सीरियाची सीमा ओलांडून आली आहे. यात आपण काहीही चूक केलेली नाही असे तिचे म्हणणे आहे. तिला कॉलीबलीची प्रेयसी म्हटले जात असले, तरी त्यांचा इस्लामी पद्धतीने निकाह झालेला होता असे समजते. जिहादी अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी तुर्कस्थान काही करीत नाही, असा आरोप पाश्चिमात्य देश नेहमीच करीत आले आहेत.
तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेवलूट कॅवूसोगलू यांनी सांगितले, की हयात बॉमेडियन ही ८ जानेवारीला सीरियाची सीमा ओलांडून आली आहे व त्याच दिवशी तिचा प्रियकर अ‍ॅमेडी कॉलिबली पॅरिस पोलिसांनी ‘शार्ली एद्बो’ या व्यंगचित्र साप्ताहिकावरील हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या चकमकीत मारला गेला. त्याने एका महिला पोलिस अधिकाऱ्याला ठार केले होते.
अंतोलिया वृत्तसंस्थेचा हवाला देऊन त्यांनी  म्हटले आहे, की ती माद्रिद येथून २ जानेवारील टर्कीत आली आहे. दूरचित्रवाणी वाहिनी हाबेर तुर्कने नंतर या महिलेची  छायाचित्रे दाखवली असून ती सबिहा गोकसेन विमानतळ इस्तंबूल येथून देशात आल्याचे म्हटले आहे. तिने चेहऱ्यावर बुरखा घातला असून तिच्या समवेत एक अज्ञात दाढीधारी मनुष्य आहे. मंत्र्यांनी सांगितले, की बॉमेडिएन हिचा कॉलिबली याच्याशी इस्लामी पद्धतीने विवाह झाला होता व ते इस्तंबूलमध्ये काडीकॉय जिल्ह्य़ात एका हॉटेलमध्ये राहत होते. आता तिच्या समवेत वेगळात दाढीधारी माणूस दिसतो आहे. ती सीरियात कशी आली हे समजू शकले नाही.
बॉमेडिएन हिला प्रवेश बंदी करण्यात आली नाही कारण फ्रान्सने तशी काही विनंती केली नव्हती तसेच ती दहशतवादाशी संबंधित असल्याची कल्पनाही दिली नव्हती, असे अंतर्गत सुरक्षामंत्री एफकान अला यांनी सांगितले.
नॅशनल इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन या तुर्कीच्या गुप्तचर संस्थेने व पोलिसांनी या प्रकरणी लक्ष ठेवले आहे.