आंध्र प्रदेश व तेलंगणात अनेक भागात उष्म्याची लाट आली असून आतापर्यंत ४३ जण मरण पावले आहेत. या भागातील तापमान कमालीचे वाढले आहे.
महसूल सचिव बी.आर.मीणा यांनी सांगितले की, कालपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणात २१ जण मरण पावले आहेत.
आंध्र प्रदेशात उष्णतेच्या लाटेने २२ जण मरण पावले आहेत. तेलंगण सरकारने उष्म्याच्या लाटेत काय काळजी घ्यावी याची माहिती जारी केली आहे. जास्त तापमान असताना घराबाहेर पडू नये अशी सूचना त्यात केली आहे. नलगोंडा, निझामाबाद व करीमनगर या जिल्ह्य़ात मोठा फटका बसला असून हैदराबादच्या हवामान खात्याचे संचालक वाय.के.रेड्डी यांनी सांगितले की, रविवापर्यंत दिवसाचे तापमान वाढतच राहील.
खम्मन येथे ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आंध्र प्रदेशात राजमुंद्रीचे जिल्हाधिकारी एच.अरूणकुमार यांनी सांगितले की, पूर्व गोदावरी जिल्ह्य़ात आठ जण तीन दिवसात मरण पावले आहेत. तेथे ४२ ते ४५ अंश तापमानाची नोंद झाली. काकीनाडा येथे ४२, राजमुंद्रीत ४३, तुनीत ४४ अंश तापमान होते असे हवामान खात्याने सांगितले. श्रीकाकुलम येथे तीन दिवसात उष्माघाताने सहा जण मरण पावले आहेत. विशाखापट्टनम येथे दोन जण मरण पावले, तर गोपाळपट्टनम येथे एक पथारी व्यावसायिक मरण पावला. विझागनगरम येथे ४८ तासात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आणखी दोन-तीन दिवस उष्म्याची लाट आंध्रच्या उत्तर किनारी भागात कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.