उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कार्यालय असलेल्या एका वित्त कंपनीच्या वसुली हस्तकांनी खासगी बसचे प्रवाशांसह अपहरण केले असल्याची माहिती बुधवारी सकाळी पोलिसांनी दिली. मालपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार झाला असून ही बस हरयाणातील गुरगाव येथून मध्य प्रदेशातील पन्ना येथे जात होती.

अतिरिक्तगृह सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले की, बसचालक, कर्मचारी व प्रवासी सुरक्षित आहेत. आग्रा येथील वित्त कंपनीने बेकायदा बसचे अपहरण केले असून बसचा मालक काल मंगळवारी मरण पावला व त्याच्या मुलाने अंत्यसंस्कार केले. बस आता नेमकी कुठे आहे हे समजलेले नाही.

आग्रा येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांनी सांगितले की, बसमध्ये शिरलेल्या तीन जणांनी ते वित्त कंपनीचे वसुली हस्तक असल्याचे सांगितले. प्राथमिक माहितीनुसार ज्या वित्त कंपनीने या वाहनासाठी कर्ज दिले होते त्यांच्या हस्तकांनी हे कृत्य केले आहे. याबाबत पोलीस पथके स्थापन करून तपास सुरू करण्यात आला आहे. ही बस खासगी असून ग्वाल्हेर येथील व्यक्तीची आहे. मंगळवारी रात्री ही बस दक्षिण बाह्य़वळण मार्गाने जात असताना रायभा टोल नाक्यावर आठ-नऊ जणांनी एसयूव्ही वाहन आडवे घातले. वित्त कंपनीचे हस्तक असल्याचे सांगून त्यांनी बस चालकाला उतरण्यास सांगितले. पण बसचालकाने बस पुढे नेली. नंतर या हस्तकांनी मालपुरा येथे बसचा ताबा घेऊन चालक व वाहक यांना उतरून दिले . प्रवाशांना आरडा ओरडा करू नका आम्ही तुम्हाला काही करणार नाही असे आश्वासन दिले. नंतर चार जण बसमध्ये चढले व बस दिल्ली-कानपूर मार्गावर नेली. वाहक व चालक यांना कुबेरपूर भागात टाकण्यात आले. नंतर त्या दोघांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली व पोलीस घटनास्थळी पोहोचले.