स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या आणि घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. मात्र, हीच वेळ जगातील सर्वशक्तिमान पुरूषावर ओढवली तर काय होईल? तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल पण रॉजर स्टोन लिखित ‘क्लिंटन्स वॉर ऑन वुमन’ या पुस्तकातील मजकूर वाचल्यास याची प्रचिती येईल. या पुस्तकात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना पत्नीचा जाच असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमुळे सध्या चर्चेत असलेल्या हिलरी क्लिंटन त्यांचे पती बिल क्लिंटन यांना मारहाण करत असल्याचे पुस्तकात म्हटले आहे. हिलरी या बिल क्लिंटन यांना घराचे दरवाजे बंद करून मारहाण करत असत. सार्वजनिक ठिकाणी अनेकदा क्लिंटन यांच्या चेहऱ्यावर व्रणदेखील दिसून आले होते. पत्रकारांनी याबद्दल विचारल्यास क्लिंटन दाढी करताना जखम झाली, असे सांगून वेळ मारून नेत असत. याशिवाय, अमेरिकन इतिहासात गाजलेल्या मोनिका लेवेन्स्की प्रकरणानंतरही हिलरी यांनी बिल यांच्या थोबाडीत मारल्याचाही दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. हिलरी यांच्या तापट स्वभावाचा फटका केवळ क्लिंटन यांनाच नव्हे तर अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसचे अधिकाऱ्यांनाही सहन करावा लागल्याचेही पुस्तकामध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदाची तोंडावर आली असतानाच हे प्रकरण उघड झाल्यामुळे आता हिलरी क्लिंटन यांची प्रतिमा डागाळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hillary clinton beats bill clinton claimed by clintons war on women
First published on: 07-10-2015 at 13:31 IST