दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या कारभाराचे केंद्र राहिलेल्या ऐतिहासिक ‘ओल्ड वॉर ऑफिस’ इमारतीवर भारताच्या हिंदुजा समुहाची मालकी प्रस्थापित झाली आहे. हिंदुजा समुहाने स्पेनमधील एका औद्योगिक समुहाशी भागीदारीत ही वास्तू विकत घेतली आहे. लंडनच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या या वास्तूचे रूपांतर आता पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात येणार असल्याचे समजते. ब्रिटनच्या संरक्षण खात्याकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
५,८०,००० चौरस फूट क्षेत्रफळ असणाऱ्या ‘ओल्ड वॉर हाऊस’ची इमारत पुढील २५० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर हिंदुजा समुहाच्या ताब्यात देण्यात आली आहे. मात्र, या व्यवहाराची नेमकी किंमत अद्यापपर्यंत कळू शकलेली नाही. सामान्य लोकांना या इमारतीत प्रवेश करण्यास मनाई होती. मात्र, नुकत्याच झालेल्या करारानुसार इमारतीच्या रचनेत काही बदल करण्यात येणार असून, हॉटेलसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, हिंदुजा समुहाचे अध्यक्ष पी. हिंदुजा यांनी आम्ही या इमारतीच्या ऐतिहासिक वारश्याचे जतन आणि या वास्तूचे वैभव अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.