उत्तर काश्मीरमधील सोपोर भागात रविवारी सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी ठार झाला.
सोपोरमधील भट मोहल्ल्यातील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्तपणे मोहीम राबवून रविवारी सकाळी दहशतवादी लपलेल्या घराला वेढा घातला. त्यानंतर दहशतवाद्याला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र त्याने सुरक्षा जवानांवर बेछूट गोळीबार केला. या वेळी प्रत्युत्तरास्तव केलेल्या गोळीबारात दहशतवादी ठारझाल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली.
मारला गेलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद शफी शेख ऊर्फ शफी पीर असे असून तो हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.