पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग करीत केलेल्या हल्ल्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला असताना, पाकिस्तानातील तुरुंगात असलेल्या सरबजित सिंग याच्या सुटकेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले. मात्र सरबजित सिंग याची बहीण दलबीर कौर यांनी सरबजितच्या सुटकेवर सद्यस्थितीचा परिणाम होणार नाही, असे आत्मविश्वासाने सांगितले.
२६ नोव्हेंबरच्या दुर्घटनेनंतर कोणताही हल्ला किंवा भारत-पाक संबंधांमध्ये तणाव निर्माण करणारा प्रश्न उपस्थित झाला की नेहमीच सरबजित सिंगच्या भवितव्याबाबत मला काळजी वाटू लागे, मात्र सद्यस्थिती लक्षात घेता त्याच्या सुटकेवर काही विपरीत परीणाम होईल असे वाटत नाही, असे दलबीर कौर म्हणाल्या.
पाकिस्तानने ज्या नृशंस पद्धतीने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली, ती घृणास्पदच आहे, असे दलबीर यांनी सांगितले. मात्र उभय देशांनी शांततामय आणि चर्चेच्या मार्गानेच परस्परांतील मतभेद सोडवावेत, अशी अपेक्षा कौर यांनी व्यक्त केली.
सरबजित सिंग याचे पाकिस्तानी वकील अवैश शेख यांनी सरबजितचा दयेचा अर्ज पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांकडे प्रलंबित असून त्यांनी स्वाक्षरी केल्यास सुटकेचा मार्ग मोकळा होईल असे सांगितले.