बिहारमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा मोठा विजय झाला आहे, तर महाआघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे, बिहार निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, निवडणूक निकालानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला असून, त्यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारच्या लोकांनी विकसित आणि समृद्ध बिहारसाठी मतदान केलं आहे. निवडणुकीवेळी मी जनतेला रेकॉर्ड व्होटिंग करण्याचा आग्रह केला होता. आणि बिहारच्या जनतेने सर्व विक्रम मोडले आहेत. मी बिहारच्या लोकांना एनडीएला प्रचंड विजय देण्याचा आग्रह धरला होता. बिहारच्या जनतेने माझा आग्रह मानला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
येत्या काळात कदाचित काँग्रेसचं विभाजन होऊ शकतं-मोदी
बिहारमध्ये भाजपानं जितक्या जागा जिंकल्या, तितक्या जागा काँग्रेस गेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळून जिंकू शकलेली नाही. काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आता फक्त नकारात्मक राजकारण झाला आहे. कधी चौकीदार चोर है चा नारा, संसदेचा वेळ वाया घालवणं, प्रत्येक संस्थेवर हल्ला करणं, कधी ईव्हीएमवर प्रश्न, कधी निवडणूक आयोगाला शिवीगाळ, कधी व्होटचोरीचा आरोप, देशाच्या शत्रूंचा अजेंडा पुढे आणणं.. काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टीकोन नाहीये. आज काँग्रेस मुस्लीम लीगी माओवादी काँग्रेस अर्थात MMC बनली आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा याच गोष्टींवर चालतो. त्यामुळेच काँग्रेसमध्येदेखील एक वेगळा प्रवाह तयार होतोय, जो या नकारात्मक धोरणाच्या विरोधी आहे. कदाचित येत्या काळात काँग्रेसचं मोठं विभाजन होऊ शकेल. अशीही टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
काँग्रेसचे नामदार डुबकी मारत होते आणि त्यांनी स्वतःसह मित्रांना बुडवलं-मोदी
काँग्रेसचे नामदार तलावात डुबकी मारत होते. त्यांनी स्वतःसह मित्र पक्षांना बुडवलं. काँग्रेस असा पक्ष आहे जो आपल्या सहकारी पक्षाच्या जागा गिळून टाकतो. मी आज काँग्रेसच्या सहकारी पक्षांना सांगू इच्छितो की काँग्रेसपासून सावध राहा. मी याआधीही म्हटलं होतं की काँग्रेसचं धोरण हेच आहे. बिहारमध्ये जो विजय झाला आहे त्यामुळे आता आपली सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. येत्या काळात बिहारची प्रगती होईल आणि हे राज्य पुढे जाईल. बिहारच्या लोकांना इथेच नोकरी मिळेल. बिहारमध्ये पर्यटनाचा विकास होईल तसंच लोकांचं सामर्थ्यही जगाला दिसून येईल. तसंच आपल्या ऐतिहासिक वारशांचं जतन केलं जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
विकास विरोधी लोकांना जनतेने उत्तर दिलं आहे-मोदी
विकास विरोधी लोकांना बिहारच्या जनतेने उत्तर दिलं आहे. आजचा निकाल हा घराणेशाहीतल्या लोकांना जनतेने दिलेलं उत्तर आहे. भारताच्या विकासात बिहारच्या लोकांचा सिंहाचा वाटा आहे. पण ज्या लोकांनी सहा दशकं देशाची सत्ता उपभोगली त्यांनी बिहारला बदनाम केलं. बिहारच्या गौरवशाही इतिहासाचा सन्मान काँग्रेसने केला नाही. तसंच बिहारच्या लोकांच्या अपमान केला. छठपूजेला ड्रामा असं म्हणणारे हे लोक आहेत.
