योगगुरू बाबा रामदेव यांनी आपली सर्व ताकद गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी लावण्याचे ठरविले आहे. आगामी लोकसभा निवडणूक आपण लढविणार नसून, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाबा रामदेव यांनी सोमवारी स्पष्ट केले.
हामीरपूरमध्ये आपल्या संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांशी बाबा रामदेव यांनी संवाद साधला. या संवादानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. रामदेव यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर आणि केंद्र सरकारमधील भ्रष्टाचारावर यावेळी कडाडून टीका केली. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे ‘निष्पाप बाळ’ असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली. केंद्र सरकारमधील भ्रष्टाचाराने परिसीमा ओलांडली असून, थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारमधील अधिकारीच दलालाची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला.