सनी गुरूदासपुरमधुन काँग्रेसचे खासदार सुनील जाखड यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. हे जर मला अगोदरच माहिती असते, तर मा कधीच यासाठी परवानगी दिली नसती. असे दिग्गज अभिनेते व भाजपाचे माजी नेते धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. बलराम जाखड हे माझ्या भावासारखे आहेत, जर मला माहिती असते की त्यांचा मुलगा सुनील जाखड गुरूदासपुरमधुन निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या विरोधात मी सनीला निवडणूक लढवण्यास परवानगी दिली नसती. तसेच, त्यांना हे देखील सांगितले की, चित्रपटसृष्टीमधुन आलेले सनी हे जाखड सारख्या अनुभवी नेत्याच्या बरोबरीने चर्चा करू शकत नाहीत.

सुनील हे देखील माझ्या मुलासारखे आहेत, त्यांचे वडील बलराम यांच्याशी माझे चांगले संबंध होते. सुनील यांच्या पाठीशी मोठा राजकीय अनुभव आहे, शिवाय त्यांचे वडील देखील अनुभवी नेते होते. सनी त्यांच्याशी वाद घालू शकत नाही. आम्ही चित्रपटसृष्टीशी संबंध ठेवणारी माणस आहोत, आम्ही याठिकाणी कोणताही वाद घालायलाही नाही तर, जनतेचे म्हणने ऐकण्यासाठी आलो आहोत. कारण, येथील जमिनीवर आम्ही प्रेम करतो.

तसेच, मुलाच्या पहिल्या रोड शो मध्ये त्याला पाठिंबा देणा-यांची अलोट गर्दी पाहिल्यानंतर आपण भावुक झालो होतो. असेही धर्मेंद्र यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, मी मुंबईतून रोड शो पाहात होतो. त्यात मोठी गर्दी होती. मी भावनिक झालो होतो. मला माहिती आहे की, लोक आमच्यावर प्रेम करतात. मात्र, एवढे अमाप प्रेम पाहून मी थक्क झालो होतो.

सुनील जाखड हे गुरदासपुरचे विद्यमान खासदार आहेत. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणूकीत २०१७ मध्ये ते विजयी झाले होते. ही जागा भाजपाचा गढ राहिलेली आहे. विनोद खन्ना १९९८ मध्ये पहिल्यांदा याठिकाणी विजयी झाले होते.