उत्तर प्रदेशच्या सनदी अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबनप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरोधात न्यायालयीन अवमान खटला सुरू करण्यासंबंधी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
नागपाल यांनी बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवून न्यायालयीन आदेशाची तामिली केली असताना त्यांना निलंबित करून राज्य सरकारनेच न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका अ‍ॅड. एम. एल. शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे संबंधित प्रशासकीय यंत्रणा किंवा अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून न्यायालयाचा अवमान केल्याचे दिसत नाही, असे न्या. एच. एल. दत्तू आणि न्या. एस. जे.मुखोपाध्याय यांच्या पीठाने निदर्शनास आणून दिले. दुर्गा शक्ती नागपाल यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्या प्रकरणी राज्य सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट करून अर्जदाराने याचिका लवकरच दाखल केली असल्याचे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.