|| दीपाली पोटे-आगवणे

विश्वचषकासारख्या स्पर्धेत शतक नोंदवणे, ही प्रत्येक फलंदाजाची इच्छा असते. आतापर्यंत झालेल्या १२ विश्वचषकांत १५ वेगवेगळ्या संघांतील ११७ खेळाडूंनी १९६ शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच ३२ शतके साकारण्याचा मान भारताच्या फलंदाजांनी मिळवला आहे.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने १४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९४ चेंडूंत १०३ धावा करून या विश्वचषकातील आपले पाचवे शतक साकारले आहे. याआधीची शतके त्याने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश यांच्याविरोधात झळकावली आहेत. भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा एकाच विश्वचषकात तीन शतके नोंदवण्याचा विक्रम, याशिवाय कुमार संगकाराच्या एकाच विश्वचषकात (२०१५) चार शतकांचा विक्रमही त्याने मोडीत काढला आहे. आता सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम त्याला साद घालत आहे. सध्या त्याच्या विश्वचषकांतील एकूण सहा शतकांची बरोबरी त्याने साधली आहे.

इंग्लंडच्या डेनिस एमिसने (१३७ धावा) भारताविरुद्ध १९७५मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकामधील पहिले शतक झळकावण्याचा मान मिळवला. त्याच दिवशी झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नरने ईस्ट आफ्रिकेविरुद्ध १७२ नाबाद धावा करून विश्वचषकातील दुसरे शतक झळकावले. या विश्वचषकात एकूण सहा शतके वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंनी साकारली होती. येथूनच शतकांच्या अध्यायाला प्रारंभ झाला. १९७९च्या विश्वचषकात आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजे दोन शतके वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी साकारली.

१९८३ आणि १९९२मध्ये प्रत्येकी आठ शतकांची नोंद झाली होती, तर १९८७मध्ये ११ शतके झळकावण्यात आली होती. १९९६मधील विश्वचषकात एकूण १६ शतके साकारण्यात आली होती. १९९९च्या विश्वचषकात ११ शतकांची नोंद असून, यात पाच भारतीय फलंदाजांच्या शतकांचा समावेश आहे. २००३मध्ये शतकांची संख्या २१पर्यंत वाढली. २००७मध्ये २० शतके नोंदली गेली. त्यानंतर ट्वेन्टी-२० क्रिकेटला सुगीचे दिवस आले. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या गौरवशाली अध्यायाला २००८मध्ये प्रारंभ झाला. त्याचा सकारात्मक परिणाम फलंदाजांच्या कामगिरीवर झाला. त्यामुळे २०११नंतरच्या विश्वचषकामध्ये शतकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. २०११च्या विश्वचषकात २४ शतके साकारण्यात आली, तर २०१५च्या विश्वचषकात सर्वाधिक ३८ शतकांची नोंद झाली आहे. याच विश्वचषकात न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने २३७ नाबाद ही विश्वचषकामधील विक्रमी धावसंख्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध केली. आर्यलडच्या केव्हिन ओ’ब्रायनने २०११च्या विश्वचषकात इंग्लंडविरोधात सर्वात जलद म्हणजेच ५० चेंडूंत शतक साकारले होते.

भारत अग्रेसर

१९८३मधील विश्वचषकात भारताच्या कपिलदेवने झिम्बाव्बेविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद १७५ धावांची झुंजार खेळी साकारली होती. भारतीय फलंदाजाच्या या पहिल्या शतकाची इतिहासात नोंद झाली. त्यानंतर १९८७मध्ये सुनील गावस्करने दुसरे शतक नोंदवले. मग सचिन तेंडुलकरने १९९६ आणि २०११च्या विश्वचषकांमध्ये दोन वेळा तर १९९९, २००३च्या विश्वचषकांत प्रत्येकी एक शतक झळकावले. त्याच्या खात्यावर विश्वचषकात एकूण सहा शतकांची नोंद आहे. १९९६मध्ये झालेल्या विश्वचषकात विनोद कांबळीने झिम्बाव्बेविरुद्ध १०६ धावांची शतकी खेळी साकारली होती. राहुल द्रविडनेदेखील १९९९च्या विश्वचषकात केनिया आणि श्रीलंकेविरुद्ध शतके झळकावली होती. सौरभ गांगुलीने वेगवेगळ्या विश्वचषकांत एकूण चार शतके नोंदवली असून, १९९९मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध १८३ या भारताच्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम रचला. याशिवाय शिखर धवनच्या खात्यावर तीन तर वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहलीच्या नावावर दोन शतकांची नोंद आहे. तसेच अजय जडेजा आणि युवराज सिंग यांनी एकेक शतक झळकावले आहे.