आज वेस्ट इंडिजविरुद्ध सामना; गेलचा विश्वचषकातील अखेरचा सामना
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उपांत्य फेरीच्या टप्प्यावर पोहोचली असूनही अफगाणिस्तानचा संघ अद्यापही यंदाच्या विश्वचषकातील पहिल्यावहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे गुरुवारी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तान पराभवाची कोंडी फोडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
अफगाणिस्तानच्या संघात वेस्ट इंडिजसारखे धडाकेबाज फलंदाज नसले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी विंडीजवर वर्चस्व गाजवले आहे. हश्मतुल्ला शाहिदी, असगर अफगाण आणि रेहमत शाह या फलंदाजांनी अफगाणिस्तानसाठी विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. परंतु संघातील खेळाडू व संघ व्यवस्थापनांमध्ये असलेले मतभेदही त्यांच्यासाठी हानिकारक ठरत आहे.
दुसरीकडे कारकीर्दीतील चौथा विश्वचषक खेळणाऱ्या ख्रिस गेलचा हा विश्वचषकातील शेवटचा सामना असून, अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो उत्सुक असेल. ३९ वर्षीय गेलने आतापर्यंत विश्वचषकाच्या आठ सामन्यांत दोन अर्धशतकांसह २३५ धावा केल्या आहेत. गेल्या लढतीत विंडीजने श्रीलंकेला कडवी झुंज दिली होती, मात्र पुन्हा एकदा आत्मघातीपणा त्यांना नडला. विंडीजकडे निकोलस पूरन, शाय होप, फॅबिअन अॅलन अशी प्रतिभावान फलंदाजांची फळी आहे. फक्त त्यांनी संयम बाळगून दडपणाच्या परिस्थितीत सुरेख खेळ केला तर विंडीजची विश्वचषकाची सांगता विजयाने होऊ शकते.
आमनेसामने – एकदिवसीय : सामने : ५, अफगाणिस्तान : ३, वेस्ट इंडिज : १, टाय / रद्द : ०/१