Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अत्यंत भव्य दिव्य असा सोहळा होणार आहे यात शंकाच नाही. देश-विदेशातल्या दिग्गजांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. १८ जानेवारीला गाभाऱ्यात मूर्ती ठेवण्यात आली. या मंदिरातला मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. रामाची मूर्ती कशी असणार? याबाबत देशभरात चर्चा आहे. रामलल्ला म्हणजेच बाळ रुपातील राम या मंदिरात असणार आहेच. याशिवाय अरुण योगीराज यांनी कृष्ण शिळा दगडापासून घडवलेली रामाची मूर्तीही असणार आहे. अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा होते आहे.

राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहेत.

कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. मैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण योगीराज यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्पं साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार. तर, त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना मैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं.

काय आहेत रामाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये?

गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे.

५ वर्षांच्या रामाची ही मूर्ती आहे जी गाभाऱ्यात बसवली जाईल आणि त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ तारखेला पार पडणार आहे.

शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीचं वजन २०० किलो आहे.

गाभाऱ्यात ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे आणि २२ जानेवारी या दिवशी दुपारी १२.२० या वेळी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होईल जो दुपारी १ वाजपेर्यंत चालण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची का?

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची उंचीची ठेवण्यात आली आहे. कारण भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही तितकीच असते. तसंच ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीची निर्मिती कृष्ण शिळा या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली आहे. हिंदू देव-देवतांच्या मूर्ती या खासकरुन कृष्ण शिळा दगडापासूनच तयार केल्या जातात. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.