अमेरिकास्थित आऊटसोर्सिग करणारी आयगेट कंपनी अथवा तेथील कर्मचाऱ्यांनी अमेरिकेतील सिक्युरिटी कायद्याचे उल्लंघन केले आहे का, त्याचा तपास एका विधी कंपनीमार्फत केला जात आहे. ब्रोनस्टेन, गेविर्टझ् अॅण्ड ग्रॉसमन, एलएलसी यांची न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी येथे कार्यालये असून आयगेट सिक्युरिटीजच्या खरेदीदारांच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्यांचा तपास करण्यात येत आहे. आयगेट कंपनीने किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांनी सिक्युरिटीज कायद्याचे उल्लंघन केले आहे का, यावर तपास कंपनी प्रकाशझोत टाकणार आहे.
आयगेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी फणीश मूर्ती यांना, एका महिला कर्मचाऱ्यासमवेत असलेल्या संबंधाची माहिती न दिल्याबद्दल, कंपनीने त्यांची हकालपट्टी केल्यानंतर कंपनीचे समभाग घसरले, असे विधी कंपनीने म्हटले आहे.
गुंतवणूकदारांना पाठविलेल्या एका संदेशात वेल्स फर्गो या बँकेने म्हटले आहे की, मूर्ती यांच्या हकालपट्टीमुळे कंपनीला नजीकच्या भविष्यात तोटा होण्याची शक्यता आहे.
लैंगिक शोषण केल्याबद्दल मूर्तीवर खटला
आयगेट कंपनीच्या गुंतवणूक संबंध विभागाच्या प्रमुखांशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यामधून त्या गर्भवती राहिल्याच्या आरोपावरून मुख्य कार्यकारी अधिकारी फणीश मूर्ती यांच्या विरोधात खटला दाखल केला जाईल, असे एका या प्रकरणातील पीडित महिलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विधी कंपनीने स्पष्ट केले आहे. आयगेट कंपनीच्या गुंतवणूकदार संबंध विभागाच्या प्रमुख अरासेली रोइज या मूर्ती यांच्यापासून गर्भवती राहिल्या आहेत. रोइज यांनी कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर मूर्ती यांनी आयगेटच्या संचालक मंडळाला रोइज यांच्यासमवेत असलेल्या संबंधांची कल्पना दिली, असे आयमन-स्मिथ अॅण्ड मार्सीने एका निवेदनात म्हटले आहे. रोइज या आयगेटच्या कर्मचारी असून त्या सध्या वैद्यकीय रजेवर आहेत, असे विधी कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. गर्भवती असल्याचे रोइज यांनी स्पष्ट केल्यावर मूर्तींनी गर्भपात करण्यासाठी दबाव आणला.