शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले धर्मगुरु गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त एअर इंडियाकडून त्यांना अनोख्या स्वरुपात अभिवादन करण्यात आले आहे. युकेसाठी उड्डाण करणाऱ्या आपल्या एका विमानावर शीख धर्मियांचे प्रतिक असलेले ‘इक ओंकार’ हे पवित्र चिन्ह तयार करण्यात आले आहे.

गुरु नानक देव यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त जगभरातील शिखांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांचे समाधीस्थळ असलेला पाकिस्तानातील करतारपूर कॉरिडॉरही दर्शनासाठी खुला झाल्याने त्यांचा आनंद दुप्पट झाला आहे. तसेच एअर इंडियानेही गुरु नानक यांच्या सन्मानार्थ आपल्या बोईंग ७८७ या विमानावर ‘इक ओंकार’ चिन्ह मुद्रीत केले आहे. ‘इक ओंकार’ हे शीख धर्माच्या विचारधारेचे मूळतत्व मानले जाते.

एअर इंडियाचे हे विशेष विमान गुरुवारी, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी पहाटे ३ वाजता अमृतसरहून युनायटेड किंग्डममधील स्टॅंस्टेडसाठी उड्डाण करणार आहे. मुंबई-अमृतसर-स्टँस्टेड या मार्गावरुन हे विमान आठवड्यातून तीन वेळा अर्थात सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उड्डाण करणार आहे. या विमानातील आणखी एक विशेष बाब म्हणजे यामध्ये शीख प्रवाशांसाठी खास पंजाबी जेवण मिळणार आहे.

दरम्यान, बिहारची राजधानी पाटणा येथे पटना साहिब गुरुद्वारा देखील प्रसिद्ध आहे. शीखांचे शेवटचे गुरु आणि महान योद्धे गुरु गोविंद सिंह यांचे हे जन्मस्थळ आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरपासून एअर इंडियाकडून अमृतसर आणि पाटण्यादरम्यान थेट उड्डाणाची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गुरुपर्वच्या निमित्ताने पटना साहिबमध्ये देखील जय्यत तयारी सुरु आहे.