अमेरिकेच्या लष्करातील ३४९ सैनिकांनी २०१२मध्ये केलेल्या आत्महत्यांचे प्रमाण अफगाणिस्तानात युद्धात मृत्यू आलेल्या सैनिकांपेक्षा जास्त असल्याचे ‘पेण्टागॉन’ने म्हटले आहे. नव्या वर्षांत याची पुनरावृत्ती अधिकच होईल, असा होरा तज्ज्ञांनी वर्ताविला आहे.
अफगाणिस्तानात युद्धात २२९ सैनिक ठार झाले असल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. कर्तव्य बजाविताना २०११ मध्ये ३०१ सैनिकांनी आत्महत्या केली होती आणि त्यामध्ये मरिन विभागातील टक्केवारी जास्त होती, असेही ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.
नौदलातील गेल्या दोन वर्षांतील आत्महत्येचे प्रमाण अतिशय कमी होते. मात्र २०१२ मध्ये त्यामध्ये ५० ते ४८ टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने सैनिकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तपासणीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.
सैनिकांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण का वाढत आहे, त्याचे कारण शोधण्यासाठी काही संशोधन संस्थांची मदत घेतली जात आहे. या आत्महत्यांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे, असे पेण्टागॉनच्या प्रवक्त्या सिंथिया ओ स्मिथ यांनी सांगितले. अमेरिकेच्या नौदल आणि हवाई दलात तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे.
शाळांवर नजर
शाळांमध्ये होणाऱ्या गोळीबारांच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अमेरिकेने कठोर पावले उचलली असून, याचाच एक भाग म्हणून बंदुकींच्या वापरावर नियंत्रणे आणणारा कायदा करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी प्रथम न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.
शाळांमधील गोळीबारास पायबंद घालण्यासाठी प्राणघातक शस्त्रांना बंदी तसेच मनोरुग्णांना बंदुका वापरण्यास बंदी घालण्याचा कायदा सेनेटमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.  ‘कनेक्टिक्यूट एलिमेण्टरी स्कूल’मध्ये अलीकडेच झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर या कायद्यास मंजुरी देण्यात आली.  अमेरिकेतील हिंसाचारास पायबंद घालण्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा हेही आग्रही होते.