देशात गेल्या एक दिवसात आणखी १५ हजार, ५१० जणांना करोनाची लागण झाली, त्यापैकी ८७.२५ टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरातमधील आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले.

देशात सध्या एक लाख, ६८ हजार, ६२७ उपचाराधीन रुग्ण असून त्यापैकी ८४ टक्के उपचाराधीन रुग्ण पाच राज्यातील आहेत, तर एकटय़ा महाराष्ट्रातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ४६.३९ टक्के इतकी आहे. त्यापाठोपाठ केरळचा (२९.४९ टक्के) क्रमांक आहे. देशातील एकूण १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एक हजाराहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत.

नवकरोनाचे २१३ रुग्ण

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील नवकरोनाची लागण झालेले एकूण २१३ रुग्ण सध्या भारतात आहेत, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

काश्मीरमधील शाळा एक वर्षांनंतर सुरू

श्रीनगर : करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास एक वर्ष बंद असलेल्या काश्मीरमधील शाळा सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आल्या. इयत्ता नववी ते १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ९ मार्च २०२० नंतर प्रथमच शाळेत हजेरी लावली.

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी लेखी परवानगी दिली आहे, अशा विद्यार्थ्यांनाच शाळेत हजर राहण्याची अनुमती देण्यात आली. बहुसंख्य खासगी शाळांनी पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे, अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र घेऊन येण्यास सांगितले होते.

इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थाचे वर्ग ८ मार्च रोजी सुरू होणार आहेत, तर उर्वरित वर्ग १८ मार्चपासून सुरू होणार आहेत, असे एका आदेशामध्ये म्हटले आहे.