एनएससीएन-आयएम च्या एका बंडखोराने मणिपुरी चित्रपट अभिनेत्रीचा जाहीर कार्यक्रमात विनयभंग केल्याच्या निषेधार्थ चित्रपट व्यावसायिक संघटनेने हिंसक निदर्शने केली, तसेच राज्यव्यापी बंद पाळण्यात आला. सूत्रांनी सांगितले की, मणिपूर फिल्म फोरमने पुकारलेल्या बंदच्या समर्थकांनी वाहनांवर दगडफेक केली, पूर्व व पश्चिम इंफाळ जिल्ह्य़ात हे प्रकार घडले आहेत. त्यांनी लोकांना घराबाहेर पडण्यासही मज्जाव केला होता. मणिपूरमधील जनजीवन या बंदमुळे कोलमडले असून दुकाने, बाजारपेठा, उद्योग आस्थापने व चित्रपटगृहे बंद होती. वाहतूक सेवाही बंद पाडण्यात आली. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागलिंगम (इलाक-मुविया) या संघटनेचा स्वयंघोषित कमांडर असलेला लेफ्टनंट कर्नल लिव्हिंगस्टोन अनल याने चित्रपट अभिनेत्री मोमोका हिचा एका जाहीर कार्यक्रमात विनयभंग केला. चंडेल जिल्ह्य़ात गाण्याच्या स्पर्धेचे सूत्रसंचालन ती करीत असताना हा प्रकार घडला होता. लिव्हिंगस्टोन याच्यावर कारवाईसाठी मुख्यमंत्री व राज्यातील नेत्यांची भेट घेऊनही काहीच उपयोग न झाल्याने बंदची हाक देण्यात आली होती, असे एमएफएफ या संघटनेच्या प्रवक्तयाने सांगितले.
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, मोमोका हिला वाचवणाऱ्या दोन कलाकारांवर लिव्हिंगस्टोन याने गोळ्या झाडल्या.पण ते कलाकार वाचले.
आजच्या बंदमुळे केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयात उपस्थिती रोडावली होती. ठिकठिकाणी सुरक्षा दलांचे जवान तैनात करण्यात आले होते. काही ठिकाणी कलाकारांसह निदर्शकांवरही लाठीमार करण्यात आला. गृहमंत्री गाइखंगम यांनी सांगितले की, लिव्हिंगस्टोन याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने पोलिसांना दिले आहेत. लिव्हिंगस्टोन हा चंडेली मतदारसंघातील विद्यमान आमदाराचा नातलग आहे.