सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणती पावले उचलावीत, यासंबंधी भारत आणि चीन यांच्या शिष्टमंडळांमध्ये सोमवारी चर्चेची पाचवी फेरी सुरू झाली. त्यानंतर उभय देशांच्या विशेष दूतांमध्ये यासंदर्भात विचारविनिमय होणार आहे. उभय देशांच्या अधिकाऱ्यांची चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. या बैठकीत भारत आणि चीन सीमेवरील घडामोडींचा आढावा घेण्यात आला. सीमा संरक्षण सहकार्य कराराची अंमलबजावणी करण्यावरही शिष्टमंडळांनी भर दिला. याखेरीज सीमेवर शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याचे उभयतांनी मान्य केले. उभय देशांमधील सैनिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने एका कार्यकारी गटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.