पाकिस्तानच्या एका आजारी नागरिकाला यकृत प्रत्यारोपण आणि तीन वर्षीय मुलीच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी भारताकडून व्हिसा देण्यात येणार आहे. विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: ही माहिती दिली. लाहोर येथील उजैर हुमायूं यांच्या आग्रहावरून त्यांच्या मुलीला वैद्यकीय व्हिसा देण्यात येणार असून तिच्यावर हृदय शस्त्रक्रिया होणार असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले.

सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर म्हटले की, आम्ही तुमच्या तीन वर्षीय मुलीवर भारतात हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी व्हिसा जारी करत आहोत. ती आजारातून लवकरात लवकर बरी व्हावी अशी कामना आम्ही करतो, असे म्हटले. त्यांनी नूरमा हबीब यांनाही त्यांच्या वडिलांना व्हिसा देण्यात येत असल्याचे सांगत दिलासा दिला. नूरमा यांच्या वडिलांवर यकृत प्रत्यारोपण केले जाणार आहे. त्यांनी म्हटले, नूरमा आम्ही तुमच्या वडिलांवर भारतात उपचारासाठी व्हिसा देत आहोत. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया व्हावी व त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत आहोत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक मुद्द्यांवर सध्या वाद आणि तणाव आहे. असे असूनही भारताकडून पाकिस्तानच्या नागरिकांच्या वैद्यकीय व्हिसाच्या अर्जांवर सहानुभूतीपूर्वक विचार केला जात आहे. यापूर्वीही पाकिस्तानच्या अनेक नागरिक व बालकांवर भारतात इलाज करण्यात आले आहेत.