भारताचा आयआरएनएसएस १ ए हा पहिलावहिला दिशादर्शक उपग्रह सोमवारी मध्यरात्री पीएसएलव्ही म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने अवकाशात सोडण्यात आला. भारताच्या सात दिशादर्शन उपग्रहांच्या मालिकेतील हा पहिलाच उपग्रह असून त्यामुळे अमेरिकेच्या जीपीएस या दिशादर्शन प्रणालीला आपण स्वदेशी पर्याय तयार करीत आहोत. विशेष म्हणजे प्रथमच श्रीहरीकोटा येथून मध्यरात्री उपग्रहाचे उड्डाण करण्यात आले.
सोमवारी रात्री ११.४१ वाजता ४४ मीटर उंचीच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक  आयआरएनएसएस १ ए या उपग्रहाला घेऊन अतिशय अचूकपणे अवकाशात झेपावला व त्याने या उपग्रहाला कक्षेत नेऊन सोडले. सतीश धवन अवकाश केंद्रावरून या प्रक्षेपकाने उड्डाण केल्यानंतर रात्रीच्या अंधारात आकाश सोनेरी ज्वाळांनी उजळून निघाले.
आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह सात दिशादर्शन उपग्रहांच्या प्रणालीतील पहिला असून त्याच्यामुळे आपल्याला १५०० कि.मी. परिसरातील कुठल्याही वस्तूचे स्थान अचूकपणे सांगता येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी सांगितले की, आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह १४२५ किलो वजनाचा असून उड्डाणानंतर अवघ्या वीस मिनिटात तो अपेक्षित कक्षेत गेला. हा उपग्रह सोडण्यास १२५ कोटी रुपये खर्च आला आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक हा अतिशय विश्वासार्ह असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून उपग्रह दिशादर्शन कार्यक्रमाच्या प्रारंभातून आपण एक प्रकारे अवकाश तंत्रज्ञानाच्या उपयोजनात एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे, असे राधाकृष्णन यांनी सांगितले.
अमेरिकेची जीपीएस, रशियाची ग्लोनास, युरोपीय देशांची गॅलिलियो, चीनची बैदू व जपानची क्वासी झेनिथ या दिशादर्शन प्रणाली असून आता भारतानेही आपली नवीन दिशादर्शन उपग्रह मालिका उभी करण्याचा प्रारंभ यशस्वीरीत्या केला आहे. याच मालिकेतील आयआरएनएसएस १ बी हा उपग्रह २०१४ मध्ये सोडला जाणार असून इ. स. २०१५ पर्यंत सर्व सातही उपग्रह सोडले जातील असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक उपग्रहाचा खर्च १२५ कोटी असणार आहे.