‘दूर राहणाऱ्या नातेवाईकांपेक्षा शेजार अधिक उपयुक्त असतो,’ असे विधान चीनच्या पंतप्रधानांनी करून दोन दिवसही होत नाहीत तोच चीनमधील सरकारी वृत्तपत्रांनी वेगळा सूर लावला आहे. पाकिस्तान-चीन मैत्रीचा भारताला कितीही हेवा वाटत असला तरीही हे वास्तव भारताने स्वीकारावयास हवे, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ज्या अगत्याने केक्वियांग यांचे पाकिस्तानात स्वागत झाले, ज्या दूरदृष्टीने पाकिस्तानचे अध्यक्ष आणि पंतप्रधान त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहिले, ते पाहता चीन आणि पाकिस्तान यांच्यात किती गाढी मैत्री आहे, हे स्पष्ट होते, असे चीनमधील सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. ग्लोबल टाइम्स हे चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे.