गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी देशात जवळपास ८० हजार करोनाबाधित रुग्णांची नोंद होत असताना मंगळवारी संख्येत घसरण झाली असून थोडा दिलासा मिळाला आहे. देशात गेल्या २४ तासात ६९ हजार ९२१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या ३६ लाख ९१ हजार १६७ वर पोहोचली आहे. दरम्यान ८१९ मृत्यूंची नोंद झाली असून मृत रुग्णांची संख्या ६५ हजार २८८ इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार. ३६ लाख ९१ हजार १६७ करोना रुग्णांमध्ये ७ लाख ८५ हजार ९९६ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. २८ हजार ३९ हजार ८८३ जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ३१ ऑगस्टपर्यंत ४ कोटी ३३ लाख २४ हजार ८३४ चाचण्या करण्यात आल्या असल्याचं सांगितलं आहे. सोमवारी १० लाख १६ हजार ९९० चाचण्या करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

करोना संकट असतानाच भारतात १ सप्टेंबरपासून ‘अनलॉक ४’ ला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून बार पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसंच मेट्रो ट्रेन सेवाही ७ सप्टेंबरपासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शाळा, कॉलेज आणि इतर शैक्षणिक संस्था तसंच शिकवणी केंद्र मात्र ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील.