भारतीयांच्या पुरुषत्वाच्या संकल्पनेत मिशांना पूर्वीपासूनच मोठे महत्त्व देण्यात आले आहे. अनेक साहित्यात तसेच चित्रपटांतही मिशांचे वर्णन करणारे प्रसंग तसेच संवादांची पेरणी करण्यात आली आहे. भारतीय मिशांचे आकर्षण हे आता जगभरात वाढत चालले असून त्यामुळेच भारत हा खोटय़ा मिशा आणि अन्य केशसंभाराचे साहित्य पुरविणारा जगातील दुसरा देश बनला आहे.
मिशी ठेवण्याची परंपरा भारतीयांमध्ये पूर्वीपासून आहे. पौरुषत्वाची खूण म्हणूनही त्यास ओळखले जाते, मात्र तरीही भारतामध्ये आता खोटय़ा मिशांची मागणी वाढू लागली आहे. मागील वर्षभरात या व्यापारात ५८ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ‘अलिबाबा डॉट कॉम’ या जागतिक ई- व्यापार संकेतस्थळाचे व्यवस्थापक खलिद इस्सार यांनी दिली. ज्या भारतीय पुरुषांना नैसर्गिक मिशा वाढविणे तसेच त्यांची योग्य रीतीने काळजी घेणे आवडत नाही असे पुरुष खोटय़ा मिशांना मोठय़ा प्रमाणात पसंती देत असल्याचे इस्सार यांनी स्पष्ट केले.
मिशांप्रमाणेच भारतीयांच्या केसांनाही जगभर मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. भारतीयांचे केस हे जगातील कोणत्याही व्यक्तींच्या डोक्यावर चपखलपणे बसू शकतात, तसेच ते बहुउपयोगी आहेत. तसेच या केसांना योग्यरीत्या कलपही लावता येतो, त्यामुळे जगभरात भारतीयांच्या केसांची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असल्याचे इस्सार यांनी स्पष्ट केले.
भारतीय केसांना सर्वाधिक मागणी अमेरिकेतून आहे, त्यानंतर अनुक्रमे चीन, ब्रिटन आणि इराण यांचा क्रमांक आहे. मिशा आणि केसांप्रमाणेच भारतीयांचे कलप, रेझर ब्लेड, शेव्हिंग फोमलाही जगभरात मोठी मागणी असल्याचे इस्सार यांनी सांगितले.