भारतीय हवाई दलाने आज एक नवी कामगिरी केली आहे. हवाई दलाच्या एम्ब्रेयर वाहतूक विमानात आकाशातील उड्डाणादरम्यान इंधन भरण्यात आले. आकाशात उड्डाण करणाऱ्या दुसऱ्या विमानाच्या सहाय्याने एम्ब्रेयर विमानात इंधन भरणा करण्यात आला. यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. युद्धजन्य किंवा युद्धसदृश्य परिस्थितीत याचा भारतीय हवाई दलाला मोठा उपयोग होणार आहे. विमानामध्ये उड्डाणावेळीच इंधन भरणे शक्य असल्याने त्यासाठी विमान जमिनीवर उतरवण्याची गरज भासणार नाही. एम्ब्रेयर वाहतूक विमानात पहिल्यांदाच अशाप्रकारे आकाशात उड्डाण सुरु असताना इंधन भरण्यात आले आहे.
आकाशात विमानाचे उड्डाण सुरु असताना इंधन भरण्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते. आकाशात इंधन भरण्यासाठी दोन्ही वैमानिकांमध्ये समन्वय आवश्यक असतो. त्यामुळेच यासाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी विशेष तयारी केली होती. विमानात इंधन भरण्यासाठी वैमानिकाला त्याचे विमान दुसऱ्या विमानाच्या (इंधन टँकर) जवळ न्यावे लागते. ही प्रक्रिया करत असताना विमान उड्डाणाच्या सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी वैमानिकाला पार पाडावी लागले.
https://twitter.com/ANI/status/936149352472383489
जगातील अतिशय मोजक्या देशांच्या हवाई दलांनी आतापर्यंत अशाप्रकारे विमान हवेत असताना इंधन भरणा केला आहे. विमानात इंधन भरण्याच्या प्रक्रियेला साधारणत: १० मिनिटांचा कालावधी लागतो. यानंतर विमान अतिरिक्त चार तास उड्डाण करु शकते. भारतीय हवाई दलाने ही कामगिरी यशस्वी केल्याने हवाई दलाच्या सामर्थ्यात भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच हवाई दलाच्या सुखोई विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. या माध्यमातून भारताने जगाला आपले सामर्थ्य दाखवून दिले होते.